नारीशक्ती वंदन विधेयक महिलांसाठी गौरवाचा क्षण – माजी आमदार कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : महिलांना लोकसभा व विविध राज्यांतील विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याची तरतूद असलेले नारीशक्ती वंदन विधेयक मंजूर होणे हा भारताच्या विकासासाठी एक ऐतिहासिक, क्रांतिकारी निर्णय असून, महिलांसाठी गौरवाचा क्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारने महिलांना लोकसभा व विविध राज्यांतील विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याची तरतूद असलेले हे विधेयक मंजूर करून नारी शक्तीचा मोठा सन्मान केला आहे. या कायद्यामुळे महिलांना राजकीय क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे हा निर्णय होऊ शकला, असे प्रतिपादन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नारीशक्ती वंदन विधेयक मंजूर झाल्याबद्दल कोपरगाव शहरातील युवा हिंदू राष्ट्र गणेश मंडळाने तयार केलेल्या नारीशक्ती वंदन फलकाचे अनावरण माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते झाले. हे क्रांतिकारी विधेयक मंजूर झाल्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी महिलांचा सन्मान करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. प्रारंभी स्नेहलताताई कोल्हे यांनी युवा हिंदू राष्ट्र गणेश मंडळाच्या गणरायाचे दर्शन घेऊन आरती केली.

विघ्नहर्ता गणेश सर्वांच्या जीवनातील अडचणी, संकटे दूर करो आणि सर्वांना सुखसमृद्धी लाभो, अशी प्रार्थना त्यांनी गणरायाच्या चरणी केली. तसेच सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ दवंगे, उपाध्यक्ष सौरभ मुंगसे, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख विमलाताई पुंडे, भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष वैशालीताई आढाव, सुषमाताई अग्रवाल, माजी नगरसेविका विद्याताई सोनवणे, शिल्पाताई रोहमारे, दीपाताई गिरमे, विजयाताई देवकर,बोधले, अशोक नरोडे आदींसह माजी नगरसेवक, नगरसेविका, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा हिंदूराष्ट्र गणेश मंडळाने नारीशक्ती वंदन विधेयकासंबंधीचा फलक लावून नारी शक्तीचा अनोख्या पद्धतीने सन्मान केल्याबदल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या, आज महिला विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशातील अनेक महिलांना उच्च पदांवर काम करण्याची संधी मिळाली आहे. प्रशासकीय सेवांपासून बँकांपर्यंत आणि संशोधन संस्थांपासून संरक्षण दलांपर्यंत विविध क्षेत्रांत महिला महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

आज देशाच्या राष्ट्रपतीपदावर द्रौपदी मुर्मू, केंद्रीय अर्थमंत्रीपदी निर्मला सीतारामन काम करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून, आता त्यांनी घटना दुरुस्ती करून नारी शक्ती वंदन विधेयकाच्या माध्यमातून महिलांना लोकसभा व विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देऊन ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. त्यामुळे देशभरातील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महिला आरक्षण कायद्यामुळे आता महिलांना राजकारणात नेतृत्व करण्याची संधी मिळणार असून, हा कायदा देशासाठी मैलाचा दगड ठरणार आहे. या कायद्यामुळे महिलांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले असून, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जितके आभार मानावे तितके कमीच आहे.

महिला बचत गटात काम करतच माझी राजकीय वाटचाल सुरू झाली. कोपरगावची पहिली महिला आमदार होण्याचा बहुमान मला मिळाला हे माझे भाग्य आहे. भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे. राजकारणात पुरुष मंडळींचे वर्चस्व असताना या क्षेत्रात काम करताना महिलांसमोर अनेक आव्हाने आहेत. याची आपल्याला कल्पना आहे. देशात अनेक महिला सक्षमपणे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असून, नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर झाल्यामुळे महिलांना आमदार, खासदार पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. या विधेयकामुळे राजकारणातील महिलांचा सहभाग निश्चितच वाढेल आणि देशाच्या विकासाला गती येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.