स्व. अटल बिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे, सूर्यभान वहाडणे, ना.स.फरांदे यांची भाजप राहिली नाही – ढाकणे

शेवगाव प्रतिनिधी, दि. १६ : आज स्व.अटल बिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे, सूर्यभान पाटील वहाडणे, ना.स.फरांदे यांची भाजप राहिली नाही. आजच्या भाजपचा मुखवटा अमुलाग्र बदलला आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस  अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी  केली. महाविकास आघाडीच्या वतीने परिसरात जिल्हा परिषद गटनिहाय चालू असलेल्या
संवाद यात्रेत एरडगाव गटाची घोटण येथील कालिका देवस्थान सभागृहात आज आयोजित संवाद यात्रेत  ढाकणे बोलत होते.

      कोणतीही निवडणुक नसतांना  काढण्यात आलेल्या संवाद यात्रेची भूमिका समजावून देण्यासाठी आल्याचे सांगून अॅड ढाकणे म्हणाले, सन २०१४ ला भावनेच्या भरात आपली चूक झाली, आता त्याचे परिणाम आपण भोगत आहोत. केंद्राने घेतलेल्या एखाद्या चुकीच्या निर्णयाचा फटका थेट आपल्या स्वयंपाक घरापर्यंत पोहचतो. म्हणून सत्ताधारी पक्षावर वचक ठेवण्यासाठी विरोधक मजबुत असावेत. सेवक, रखवालदार म्हणून सांगत सत्तेत आलेल्या रखवालदाराने आपली बंदरे, विमानतळाची वाट लावली.

एलआयसी मधून १४ हजार कोटी अदानीला दिले. रिझर्व बँकेचा राखीव निधी देखील पळवला. शेतीमालाला दुगना भाव देऊ असे आश्वासित करणाऱ्या भाजपने ऑस्ट्रेलियातून कापसाच्या सात लाख गाठी आयात करून कापसाचे भाव पाडले. ‘आपकी बार मोदी सरकार’ अशी गॅसची जाहिरात करणाऱ्या त्या महिलेला विचारा, मोदी यांनी देश कुठे नेऊन ठेवला ते.
सर्वत्र महागाई बोकाळली, बेकारी वाढली. अतिवृष्टीचे अनुदान अद्याप मिळाली नाही. निवडून दिलेल्या पक्षाने लोकप्रतिनिधीने याबाबत लक्ष घालायला हवे. मात्र त्यांना त्यासाठी सवड नाही. लाईटच्या झटक्यातून सावरण्यासाठी मतदानाचा झटका द्यावा लागेल असेही ते शेवटी म्हणाले.

        माजी सभापती डॉ. क्षितिज घुले म्हणाले, आमदार फक्त घोषणाबाजी करतात. आपल्या प्रश्नाला डावतात. अतिवृष्टीचे पैसे अद्याप मिळाले नाहीत. आपल्या अडचणीच्या वेळी मदतीला कोण येतो हे आपण ओळखले पाहिजे.
 प्रारंभी ही संवाद यात्रा असल्याने आपण संवाद साधावा. आपणास काय अडचणी येतात त्या प्रथम मांडा असे आवाहन ढाकणे यांनी केले असता संदीप मोटकर, सर्जेराव ढाकणे, कल्याण मोटकर, बाळकृष्ण बर्डे, अशोक आवारी, नवनाथ भवर, मदन मोटकर, मधुकर विघ्णे, नाना पाटील मोटकर आदींनी परिसरातील रस्त्याच्या, विजेच्या, घरकुल, नळ पाणीपुरवठ्याच्या आणि ऊस तोडीतील अडचणी मांडल्या. यावेळी ढाकणे यांनी ज्ञानेश्वर व केदारेश्वर या भागातील उसाचे टिपूर देखील शिल्लक ठेवणार नसल्याची हमी दिली.

       बंडू पाटील बोरुडे, शिवशंकर राजळे, पंडितराव भोसले, डॉ.अमोल फडके यांची ही भाषणे झाली. त्यांनी लोकप्रतिनिधी कुठेही नसतात. टक्केवारीने पैसे वसुली होते. दोन्ही नगरपरिषदेने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. ठेकेदारांची टोळीच तयार झाली असल्याची टीका या वक्त्यांनी केली. मंगेश थोरात, डॉ. प्रकाश घनवट, कुंडलिकराव घोरतळे, बाळासाहेब शिरसाट, शेषराव बटुळे, कुंडलिक घुगे, रणजित घुगे आदि उपस्थित होते. शरद सोनवणे यांनी सुत्रसंचलन केले. संजय मोटकर यांनी आभार मानले.