माजी आमदार कोल्हे यांच्या पाठपुराव्यामुळे रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२३-२४ मध्ये लेखाशीर्ष ५०५४ इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरणअंतर्गत कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव ते घोयेगाव, धारणगाव ते ब्राह्मणगाव चौफुली, बहादराबाद ते वेस आणि तळेगाव मळे ते उक्कडगाव या चार रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या रस्त्यांच्या कामांसाठी राज्य सरकारने एकूण ८० लाख रुपये निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघातील काही ठिकाणच्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने नागरिकांचे हाल होत असून, दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव ते घोयेगाव (इजिमा २१५), धारणगाव ते ब्राह्मणगाव चौफुली (इजिमा ५), बहादराबाद ते वेस (इजिमा १३) आणि तळेगाव मळे ते उक्कडगाव (इजिमा ८) या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्या भागातील जनतेची मोठी गैरसोय होत आहे.

या चारही रस्त्यांच्या मजबुतीकरणाचे आणि डांबरीकरणाचे काम तातडीने व्हावे आणि त्यासाठी आवश्यक निधी मंजूर करावा म्हणून माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. स्नेहलताताई कोल्हे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात लेखाशीर्ष ५०५४ इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरणअंतर्गत या चारही रस्त्यांच्या एकूण ८० लाख रुपये खर्चाच्या मजबुतीकरण आणि डांबरीकरण कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ५०५४-४५४२, इतर जिल्हा रस्ते विकास व मजबुतीकरण या लेखाशीर्षअंतर्गत अहमदनगर जिल्हा परिषदेसाठी जिल्ह्यातील विविध भागातील रस्त्यांच्या कामांसाठी   जिल्हा नियोजन समितीमार्फत एकूण ९०० लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. शासनाने ग्रामीण रस्ते विकास व मजबुतीकरण ५०५४ अंतर्गत करावयाच्या कामाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

शासननिर्णयानुसार सदर लेखाशिर्षांतर्गत जिल्ह्यातील एकूण आठ रस्त्यांच्या कामांना रस्ते विकास योजनेनुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सदर रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेबाबतचे आदेश अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आहेत. या एकूण आठ रस्त्यांच्या कामांचा अंदाजित खर्च एकूण २१० लाख रुपये इतका आहे.

त्यामध्ये कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव ते घोयेगाव (इजिमा २१५) रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २० लाख, धारणगाव ते ब्राह्मणगाव चौफुली (इजिमा ५) रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २० लाख, बहादराबाद ते वेस (इजिमा १३) रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २० लाख व तळेगाव मळे ते उक्कडगाव (इजिमा ८) या रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २० लाख रुपये निधीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन या रस्त्यांच्या कामांना सुरुवात होणार आहे, असे स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले. दरम्यान, या रस्त्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याने उक्कडगाव, घोयेगाव, धारणगाव, ब्राह्मणगाव, बहादराबाद, वेस, तळेगाव मळे, उक्कडगाव व परिसरातील ग्रामस्थांनी स्नेहलताताई कोल्हे यांचे आभार मानले आहेत.