डाक विभागाच्या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा – आमदार मोनिकाताई राजळे

शेवगांव प्रतिनिधी, दि. २१ : शेवगाव येथे डाक विभागाच्या माध्यमातून सुरु  झालेल्या उपक्रमाचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन करून संपूर्ण भारतातून निवड झालेल्या पाच हजार गावांपैकी शेवगावाची डाक चौपाल अंतर्गत निवड झाली. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले आहे.

भारत सरकार संचार मंत्रालय डाक विभाग यांच्यामार्फत सप्टेंबर २०२४ अखेर संपूर्ण देशांमध्ये पाच हजार  गावांमध्ये डाक समुदाय विकास प्रकल्प अंतर्गत डाक चौपाल म्हणजेच प्रत्येक गावामध्ये केंद्र सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. नुकताच संचार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारलेले  मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अभिनव संकल्पनेतून गावातील प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत डाक विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना पोहोचाव्यात हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही योजना हाती घेण्यात आली असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.

“बेटी बचाओ बेटी पढाओ” या अभियानाअंतर्गत केंद्र सरकारने सुरू केलेल्या सुकन्या समृध्दी योजनेचा लाभ सामान्य कुटुंबातील मुलींना मिळावा याकरिता आमदार राजळे यांनी पोस्ट कार्यालयात ३०० मुलींच्या सुकन्या समृध्दी योजनेचा पहिला हप्ता भरून खाते उघडले व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त मुलींना सहभागी करून घेणेसाठी आवाहन केले. 

पोस्ट विभागात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची खाते संबंधित महिलांच्या आधार कार्ड व मोबाईलच्या सहाय्याने फक्त दोनशे रुपयात उघडण्यात येते, पी एम किसान मातृ वंदना इत्यादी योजनेचे खाते तसेच डाक विभागाच्या इतर योजना आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करणे, पोस्ट ऑफिस सेविंग खाते रिकरिंग खाते, अथवा मुदत ठेव योजना, महिला सन्मान योजना, अपघाती विमा, ग्रामीण टपाल  जीवन विमा, पासपोर्ट सुविधा इत्यादी सेवांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. संपूर्ण भारतातील पाच हजार गावांपैकी शेवगावाची डाक चौपाल अंतर्गत निवड झाली. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारतीय डाक विभाग हा केंद्र सरकारच्या योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत असल्याचे प्रतिपादन  रामेश्वर ढाकणे यांनी व्यक्त केले. यावेळी अहमदनगर विभागाचे डाक निरीक्षक  हनुमंत चव्हाण, घनश्याम शहा, दीपक भुसारी, विशाल घुले, IPPB ब्रांचचे दिगंबर सोनवणे, भाजपाचे जेष्ठ नेते बापुसाहेब भोसले, भिमराज सागडे, बापुसाहेब धनवडे,  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अशासकीय सदस्य कचरू चोथे, अशोकराव आहुजा, सागर फडके, महेश फलके, शिवाजीराव भिसे, वसुधा सावरकर, उषाताई कंगणकर, डॉ. पाटील, संदीप खरड, विष्णुपंत घनवट, शेखर महाराज मुरदारे, कैलास सोनवणे, अनिल सुपेकर, किरण काथवटे, अमोल माने तसेच शेवगाव तालुक्यातील सर्व पोस्टल ग्रामीण डाक सेवक कर्मचारी यांचेसह  शेवगाव   तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.