शेवगाव पोलिसांच्या कृतीचे नागरिकांनी केले स्वागत

शेवगाव प्रतिनिधी, दि. २५ : रविवारच्या आठवडे बाजारात फिरून रस्त्यावर दुकाने लावणाऱ्या  व्यावसायिकांना शेवगाव पोलिसांनी समज देत उठवून मागे सरकवून बसवले. शेवगाव शहरातील वाढती वाहतूक कोंडी व होणारे
अपघात टाळण्यासाठी, शेवगाव पोलिसांनी रस्त्यावरच दुकाने थाटणाऱ्या विक्रेत्यांना संभाव्य धोका समजावून सांगत, समज देऊन रस्त्याच्या कडेला बसण्याच्या सूचना देत व्यावसायिकांचे उद्बोधन केले. येथे नुकतेच रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी हा उपक्रम राबवला. पोलिसांच्या या कृतीचे अनेकांनी स्वागत केले.

        गेल्या आठवडयात तिघांना रस्ते अपघातात प्राण गमवावे लागले. वाहतूक कोंडी, अतिक्रमण या सारख्या गंभीर समस्ये बाबत विविध संघटना, राजकीय पक्षांनी, शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांची भेट घेऊन, निवेदन देत रस्त्यावरील अतिक्रमणे, वेडीवाकडी उभी राहणारी वाहने हटवावी अशी मागणी केली होती.

नागरे यांनी देखील ही बाब गांभीर्याने घेऊन, आज बाजाराच्या दिवशी सकाळी सहकाऱ्यांना सोबत घेऊन, विविध रस्त्याची पाहणी गेली. यावेळी रस्त्यावर विक्रीसाठी माल घेऊन बसलेल्या विक्रेत्यांना, होणारी वाहतूक कोंडी, झालेल्या अपघाताची माहिती देत दुकाने मागे घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी प्रतिसाद देत विक्रेत्यांनी आपली दुकाने रस्त्याच्या बाजूला घेतली.

       वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, क्रांती चौक, मिरी रोड आदी चौकात, प्रत्येकी दोन पोलिसांची नेमणूक करुन, वाहतूक कोंडी होणार याची दक्षता घेण्याच्या सूचना पोनि नागरे यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या. नागरे यांच्या भुमिकेचे नागरिकांनी स्वागत करुन समाधान केले आहे.