तालुक्यात होणार १६ हजार वृक्षांची लागवड

गटविकास अधिकारी कदम यांची संकल्पना

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : शेवगाव पंचायत समितीला  सामाजिक भान जपणारे आणि आपण ज्या समाजातून आलो, त्याचे काही देणे लागतो या भावनेतून काम करणारे राजेश कदम हे गटविकास अधिकारी लाभले आहेत. विविध समाज उपयोगी नवनविन उपक्रम राबविणारे गटविकास अधिकारी कदम यांनी स्वसंकल्पनेतून ‘उमेद एक झाड मायेचे’ हा उपक्रम सध्या हाती घेतला आहे. या उपक्रमाद्वारे तालुक्यातील महिला बचत गटाच्या सहकार्यातून तब्बल १६ हजार वृक्षांची लागवड व त्यांचे संगोपन करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे.

शेवगाव तालुक्यात सोळाशे महिला बचत गट असून प्रत्येक गटाला दहा वृक्ष देण्यात येणार असून बचत गटांतील महिलांनी ते  स्वतःच्या जागेत व स्वनिगराणी खाली  लावून त्यांचे  संगोपन करायचे आहे.  नगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील नर्सरीतून  ही वृक्ष संपदा कदम यांनी मोफत मिळवली असली तरी ती आणण्यासाठी ट्रकच्या वाहतुकीचा व ती भरण्या उतरण्याचा मोठा खर्च कदम स्वतः करत आहेत.  

पर्यावरणाचे संवर्धन व्हावे व दिवसेंदिवस पृथ्वीतलावरील ढासळत चाललेला समतोल साधला जावा या उद्देशाने तसेच  सामाजिक ऋणाच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्याचा मनोदय निश्चित केल्यावर तो शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी महिला अधिक कार्यतत्पर असल्याने महिलांचेच सहकार्य घेणे उचित समजून त्यांनी महिला बचत गटाचे सहकार्य  घेतले आहे.

पहिल्या टप्प्यात प्रत्येक महिला बचत गटास पाच वृक्ष देण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसात तीन ट्रक मधून आठ हजार झाडे सध्या पंचायत समितीच्या प्रांगणात आणण्यात आली आहेत. तीन हजार वृक्षांच्या रोपाची पहिली ट्रक कदम व  विस्तार अधिकारी सचिन भाकरे, उमेद अभियान तालुका व्यवस्थापक फिरोज सय्यद व त्याचे सहकारी, काही ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी  स्वतः श्रमदान करून भरली आहे.  आणलेली झाडे वितरित करून लागवड झाली की लगेच पुढील आठ हजार झाडे आणून वितरित करण्याची कदम यांची यंत्रणा सज्ज आहे.