शहरात डेंग्यूचे थैमान, आमदार व प्रशासन नाच गाण्यात रममाण? – दत्ता काले

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : शहरात आरोग्याचे प्रश्न मोठ्या वाढले आहे. पावसाळ्यात शहरात साथीचे व संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी प्रशासनाने औषध फवारणी करणे आवश्यक होते. त्या प्रकारची सूचना देखील युवानेते विवेक कोल्हे यांनी दिली होती. मात्र अद्यापही ढिसाळ कारभार करणारी यंत्रणा सुधारली नाही. आमदार डोळे झाक करून स्वतःची मनोरंजनाची हौस भागवत असून नागरीकांना वाऱ्यावर सोडले आहे. तर दुसरीकडे आमदारांच्या तालावर नाचणारे प्रशासन नाच गाण्याचे नियोजन करण्यात मग्न आहे ? असा परखड सवाल भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले यांनी केला आहे.

रस्त्याची दुरावस्था होऊन चिखलाचे व डबक्यांचे प्रमाण वाढले आणि तुंबलेल्या गटारी यामुळे डासांचे साम्राज्य झाल्याने नागरीकांना डेंग्यू, चिकनगुण्या, गोचीड ताप या सारख्या आजाराचा सामना करावा लागतो आहे. दूषित पाणी पाजून पोटाचे विकार आणि खराब रस्त्यांनी मणक्याचे आजार वाढत आहे. ढिसाळ कारभारामुळे जनतेला अपेक्षित असणाऱ्या मूलभूत सुविधांचा बोजवारा वाजलेला आहे. प्रश्न घेऊन जाणाऱ्या नागरीकांना ठराविक राजकीय लोक जाऊ देत नाहीत असे आरोप नागरिक करू लागले आहे.

शहराला आजारांच्या दरीत लोटून लोकप्रतिनिधी मात्र नाच गाण्यात मग्न आहे. त्यांच्या दिमतीला प्रशासन वापरले जात असून जनता मात्र समस्यांनी त्रस्त झाली आहे. वाढलेल्या आजारांमुळे रुग्णालयात गर्दी असून आर्थिक गणित अनेकांचे कोलमडले आहे. गोरगरीब नागरीकांना सुख सुविधा देण्यात सपशेल फोल असणारे केवळ वेळकाढूपणा करण्यात मग्न आहे. सौम्य मागणी करून प्रशासन कृती करणार नसेल तर शहरातील डास पकडुन ते अधिकाऱ्यांच्या दालनात आणून सोडायची वाट पाहिली जाते आहे का ?

नागरिकांचे आरोग्य हे प्राधान्याने जपले जावे. पायाभूत सुविधा आणि आरोग्याच्या सुविधा चांगल्या देण्यासाठी जबाबदार घटक म्हणून प्रशासनाने तातडीने पावले उचलावी अशी मागणी दत्ता काले यांनी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.