राजकोट पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ आमदार काळेंच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने गुरुवार (दि.२९) रोजी संपूर्ण राज्यभर मूक आंदोलन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ बसून मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आठ महिन्यापुर्वी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला पुतळा तीन दिवसांपूर्वी कोसळला हि घटना अत्यंत वेदनादायी आणि मनाला संताप आणणारी  आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले किल्ले आजही अभेद्य आहेत. मात्र आठ महिन्यापूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो हे अनाकलनीय आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी पहिली अस्मिता असून त्यांच्याबाबत झालेला हा प्रकार कोणताही शिवप्रेमी खपवून घेणार नाही. याकडे आ.आशुतोष काळे यांनी मूक आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. राज्य सरकारने यापुढील काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारतांना अतिशय काळजी घेवून तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा अशा आशयाचे तहसीलदार महेश सावंत यांना आ.आशुतोष काळे यांनी निवेदन दिले.