शेवगाव प्रतिनिधी, दि ३ : जनशक्ती विकास आघाडी च्यावतीने गुरुवारी (दि.५ ) शेवगाव येथे वज्र निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जनशक्ती विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे यांनी आज सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत दिली.
या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे व ज्येष्ठ पत्रकार विलास बडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ‘ जिंकून आणले पाणी ‘ या लघु चित्रपटाचे तसेच ‘ पाऊले सामर्थ्याची ‘ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. अशी माहिती देऊन शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघात ठराविक तीन घराणांच्याच हातातच आलटून पालटून सत्ता राहिल्यामुळे सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व आजपर्यंत विधानसभेत झालेले नाही.
एकमेकांचे हितसंबंध जपणारे हे प्रस्थापित साखरसम्राट सामान्य लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याने गोर गरिबांसाठी व ‘नाही रें ‘चा आवाज विधिमंडळात पोहोचण्यासाठी जनता हाच आमचा पक्ष असे समजून हर्षदाताई काकडे या निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचा निर्धार ॲड . काकडे यांनी जाहीर केला.
ॲड काकडे पुढे म्हणाले, गेल्या साठ वर्षापासून काकडे घराण्याने मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी लढा दिलेला आहे, त्यामुळे प्रस्थापितांच्या विरोधातील पर्याय म्हणून जनता सौ हर्षदाताई काकडे यांच्या उमेदवारी कडे पाहत आहे. जनशक्ती विकास आघाडीने आजपर्यंत केलेली कामे, आंदोलने याची माहिती या पुस्तकात व चित्रपटात देण्यात आलेली आहे. या मेळाव्यास मतदारसंघातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवाजीराव काकडे यांनी केले. यावेळी माजी जि.प सदस्या सौ. हर्षदाताई काकडे, जगन्नाथ गावडे, भाऊसाहेब सातपुते उपस्थित होते.