कोपरगावच्या गढुळ पाण्यावरून पुन्हा राजकारण ढवळे
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३ : गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाने सलग दमदार हजेरी लावल्याने सर्वञ पाणीच पाणी झाले. धरणं तुडुंब भरली. सध्या अतिवृष्टी सारखी वेळ येऊनही कोपरगाव शहरातील नागरीकांना मात्र आठ दिवसाआड पाणी का दिले जाते याचा शोध घेतला असता काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत अशी माहिती माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पञकात म्हंटले आहे.
ते म्हणाले की, मुबलक पाणीसाठा असताना देखील नागरीकांना आठ दिवसांनी पिण्याचे पाणी मिळते अशी जनभावना तयार केली. पाच नंबर तलाव पूर्ण करून आम्हीच कसे पाणी चार दिवसांनी देतो असे दाखवण्यासाठी आमदार काळे यांच्याकडून नागरिकांच्या भावनांशी खेळले गेल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचा घणाघात माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी केला आहे.
गेले तीन ते चार वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, राजकीय पदाधिकारी यांनी वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाकडे किमान चार दिवसांनी पाणी द्या अशी मागणी केली होती. मात्र वारंवार खराब आणि दूषित पाणी मिळूनही वेळ मारून नेण्याचे काम केले गेले. पाणीपुरवठा करणारे तलावात मुबलक पाणी असूनही प्रशासन शहराला आठ दिवसांनी पाणी पुरवत होते. अधिकाऱ्यांना तशा प्रकारे तंबी देऊन नकारात्मक वातावरण ठेवण्यासाठी सूचना होत्या का? पालिकेचा वापर करून निवडणुका जवळ आल्यानंतर पाण्याचे दिवस कमी करून राजकीय श्रेय मिळवण्याचा प्रकार आहे, मात्र जनतेसमोर हे नाटक उघडे पडले आहे.
नैसर्गिक पर्जन्यमान चांगले असल्याने मुळातच चार दिवसांनी पाणी देणे शक्य होते. गेले काही काळ पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकत होता, मात्र राजकीय महत्त्वाकांक्षा आडवी येऊन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचे काम विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे. स्वतः नकारात्मक वातावरण करायचे आणि नंतर आपणच त्यावर कसे काम करतो हे दाखविण्यासाठी जनतेला भुलवायचे असा गंभीर प्रकार समोर आला आहे.
जर यापूर्वी चार दिवसाआड पाणी मिळाले असते तर महिलांचा त्रास कमी झाला असता व बाजारपेठेत देखील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायांना झळ बसली नसती. एका श्रेयावादासाठी प्रशासनाचा गैरवापर झाला असून अनेकांच्या भावनांशी खेळून जनतेचे नुकसान झाले आहे अशी टीका सोनवणे यांनी केली आहे.
आठ दिवसांपासून या विषयावर अनेकांनी पालिकेत संपर्क केला असता मुख्याधिकारी महोदय हे रजेवर निघून गेले असल्याची बाब समोर आल्याने पाण्याचे राजकीय षडयंत्र उघड पडले आहे. पालिका कर्मचारी संपावर आहे, शहरात विविध आजाराने नागरिक त्रस्त आहे आणि गटारीचे पाणी घरात घुसत असताना हे प्रश्न सोडविण्याचे मुख्याधिकारी यांना कोणतेही गांभीर्य दिसत नाही – माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे