कोपरगाव प्रतिनिधी, दि.३ : कोपरगावकरांसाठी अत्यंत महत्वाचा असणारा ५ नंबर साठवण तलाव शीघ्र गतीने पूर्णत्वाकडे जात आहे. लवकरच या साठवण तलावात पाणी सोडण्यात येणार असून आ.आशुतोष काळेंच्या हस्ते जलपूजन करण्यात येणार असल्याची आनंदाची माहिती कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने कोपरगावकरांना देण्यात आली आहे.
कोपरगावकरांना मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षा असलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी पुढाकार घेत २०१९ च्या निवडणुकीपूर्वी कोपरगावकरांना दिलेला शब्द पूर्ण करतांना निवडून आल्यानंतर तीनच महिन्यात ५ नंबर साठवण तलावाच्या प्राथमिक स्वरूपातील खोदाई कामाला प्रारंभ करून आश्वासक सुरुवात केली होती. तेव्हापासून कोपरगावकरांना आपले नियमित व स्वच्छ पाणी मिळण्याचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार याची प्रतीक्षा लागली होती.
आ. आशुतोष काळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या साठवण तलावासाठी त्यांनी १३१.२४ कोटी निधी आणला असून १५ टक्के रक्कमेचा निधी देखील माफ करून कोपरगावकरांचे जवळपास २० कोटी रुपये वाचविले आहे. त्याचबरोबर कोपरगाव शहराच्या लगत निर्माण होत असलेली नवीन उपनगरे त्यामुळे वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करून वाढीव ३.३६ एम.एल.डी.वाढीव पाणी देखील मंजूर करून घेतले आहे.
खोदाई काम पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी ५ नंबर साठवण तलावाच्या बाजूच्या भिंतीचे कॉंक्रीटीकरण कामाचा शुभारंभ हजारो कोपरगावकरांच्या उपस्थित आ.आशुतोष काळे व सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते झाला. त्यानंतर जसजसे ५ नंबर साठवण तलावाचे काम पुढे पुढे जात होते तस तसे कोपरगावकरांनी सुरु असलेले काम पाहण्यास येत होते. यामध्ये सर्व जाती धर्माच्या नागरिकांसह कोपरगाव शहरातील प्रतिष्टीत नागरिक व जाणकार मंडळी देखील होती.
त्यावेळी युद्धपातळीवर सुरु असलेले ५ नंबर साठवण तलावाचे काम पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अलौकिक समाधान दिसून येत होते. त्याबरोबरच काम कधी पूर्ण होणार याची प्रतीक्षा देखील त्यांना लागली होती, ती प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच ५ नंबर साठवण तलावामध्ये पाणी सोडण्यात येणार असून आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे.