लाडक्या बहिणीची बँकेकडून आडवणूक

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : मुख्यमंत्री लाडकी बहिणीचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर बँका ते पैसे बहिणींना न देता परस्पर आपल्या वसूली पोटी जमा करत असल्याच्या तक्रारी आहेत. तालुक्यातील शेकटे बुद्रुक येथील अनेक महिलांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे पैसे शेवगाव येथील फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक येथे आधार लिंकिंग असल्याने जमा झाले आहेत.

परंतु बँक प्रशासनाच्या आडमूठ्या धोरणामुळे बँकेत वारंवार चकरा मारून देखील हे पैसे देण्यास बँक प्रशासनाने नकार दिल्याने त्या महिलांनी शुक्रवारी ( दि.६ )  शेवगावचे तहसीलदार प्रशांत सागडे यांना लेखी निवेदन देत आपली व्यथा मांडली आहे.

तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, शेवगाव येथील फिनकेअर स्मॉल फायनान्स या बँकेचे आम्ही कर्ज घेतले होते, त्या कर्जाची आम्ही वेळेवर परतफेड करत होतो, परंतु करोना काळात अनेक अडचणी आल्याने आम्ही सर्व महिला मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा चालवत होतो. त्यातच शेवगाव येथील फिनकेअर स्मॉल फायनान्स या बँकेने आम्हा सर्व महिलांचे आधार लिकिंग करून घेतल्याने  मुख्यमंत्री लाडकी बहीण  योजनेचे आमचे  पैसे सदर बँकेत जमा देखील झाले आहेत.

या योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारची कपात करू नका, असे महिला आणि बाल विकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांचे राज्यातील सर्व बँकांना आदेश असतांना तुमच्याकडे आमच्या बँकेचे कर्ज आहे असे कारण सांगत बँक प्रशासनाने आम्हाला पैसे देण्यास नकार दिल्याने सदर बँकेवर आपण योग्य ती कारवाई करावी व आम्हाला आमच्या लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळवून द्यावेत अशी विनंती  केली आहे.      

निवेदनावर राणी गरड, गोदावरी क्षीरसागर, जनाबाई गरड, कांताबाई क्षीरसागर, मीनाबाई गरड, सुरेखा गरड, अर्चना बोरुडे, यमुना काकडे, शांताबाई बोरुडे, रुक्मिणी काकडे आदींच्या सह्या आहेत.