शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : भगवान शंकराची निःसिम भक्ती केली तर साधकाला त्याच्या मनोवांछित फळ निश्चित मिळते. मात्र सध्याच्या कलियुगात नाम भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. शिवमहिमेचे महत्त्व आघात असून शिवपुराण गारा म्हणजेच जिवंतपणी कैलासाचे दर्शन केल्यासारखे आहे. घोर कष्टापासून शिवपुराण मुक्तता करू शकते. सत्ता, संपत्तीच्या लोभातून जीवन जगणाऱ्यांना आदर्श जीवन जगण्याचा संदेश शिवपुराणातून मिळत असल्याने शिवपुराण कथेचा महिमा कायम टिकणारा असल्याचे प्रतिपादन हभप समाधान महाराज शर्मा यांनी केले.
लोकनेते स्वर्गीय मारुतराव घुले पाटील यांच्या जयंतीनिमित्ताने घुले परिवाराच्या वतीने शेवगाव येथील खंडोबा मैदानावर कथाकार समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतमय वाणीतून आयोजित केलेल्या शिवपुराण कथेचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला, यावेळी कथेचे पहिले पुष्पगुंपताना शर्मा महाराज उपस्थित बोलत होते.
प्रारंभी शिवपुराण कथाकार शर्मा महाराज यांची कथास्थानापासून शहरातील विविध भागातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच तालुक्यातील आखेगाव येथील जोग महाराज संस्थानच्या बाल वारकऱ्यांसमवेत महिलांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती. यावेळी संयोजन समितीच्या वतीने श्री क्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराज संस्थानचे ह भ प प्रवीण महाराज गोसावी, आखेगाव येथील जोग महाराज सेवा केंद्राचे हभप राम महाराज झिंजूर्के, राम महाराज उदागे, उद्धव महाराज सबलस, जगन्नाथ महाराज शास्त्री, ज्ञानेश्वर महाराज बटुळे आदि संत महंत माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. क्षितीज घुले, तेजस्विनी घुले, काकासाहेब नरवडे, संजय कोळगे, नियोजन समितीचे पदाधिकारी सदस्य यांच्या हस्ते लोकनेते मारुतराव घुले पाटील व ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले.
शर्मा महाराज म्हणाले, आज सर्वच क्षेत्रात लोभाचे प्रमाण बेसुमार वाढले आहे. प्रत्येक गोष्टीत आपल्याला काय मिळेल? याचा विचार केला जातो मात्र समाजाचे भले करणारे थोडेच असतात. माणसे वापरण्यासाठी नसतात तर ती जपण्यासाठी असावीत. त्यामुळे सामान्य मनुष्याला प्रेम आणि आधार देण्याची वृत्ती सर्व श्रेष्ठ ठरते. प्रत्येकाने ‘रील’ मध्ये नव्हे तर ‘रियल’ मध्ये विश्वास ठेवला पाहिजे. त्यासाठी वाणी धार असणारी नसावी तर ती आधार देणारी पाहिजे. जीवन हलके असले तरी चालेल मात्र ते हलकट नसावे. ज्याचा हेतू चांगला, त्याचा सेतू चांगला.
महादेव काळाचे ही काल आहेत म्हणूनच त्यांना महाकाल म्हटले जाते. शंभूचे ‘त्रिशूल ‘ हे आयुध माणसातील काम, क्रोध व मत्सराचा विनाश करते तसेच कलियुगात घोर कष्टापासून शिवपुराणच मानवाची मुक्तता करू शकते. त्यामुळे प्रत्येकाने शिवपुराणकथा श्रवण केली पाहिजे. शिवपुराण कथा ऐकणे म्हणजेच जिवंतपणी कैलासाचे रिझर्वेशन केल्यासारखे आहे.
कथा श्रवण करण्यासाठी पहिल्या दिवशी महिला व पुरुषांची तोबा गर्दी झाली. मा. आ. चंद्रशेखर व राजश्री घुले, माजी सैनिक, पत्रकार, छायाचित्रकार, तालुका पेन्शनर्स, शहरातील महिला भगिनी मंडळ आदींच्या हस्ते आरती करण्यात आली.