२५ सप्टेंबर रोजी विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर दिव्यांगांचा धडक मोर्चा

शेवगाव प्रतिनिधी, दि. २१ : दिव्यांगांच्या विविध महत्त्वाच्या मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि २५ ) मंत्रालयावर दिव्यांगांच्या धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात शेवगाव तालुक्यासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव सहभागी होणार असल्याची माहिती प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख गणेश हनवते यांनी दिली.

प्रहार दिव्यांग आक्रोश मोर्चाच्या नियोजनासाठी शेवगाव येथे जिल्हा संपर्कप्रमुख गणेश हनवते यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी पार पडलेल्या दिव्यांग बांधवांच्या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. राज्यातील दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये पेन्शन तातडीने लागू करण्यात यावे. दिव्यांगांचे मानधन संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर उशिराने जमा होते ते नियमित वेळेत मिळावे. राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुसज्य अशा पद्धतीने दिव्यांग भवनाची निर्मिती करण्यात यावी याकरिता एसटी आगारा जवळची जागा मिळावी.

अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा राज्यातील दिव्यांगांना व्यवसायासाठी आणि राहण्यासाठी शासन निर्णयाप्रमाणे प्रत्येकी २०० स्क्वेअर फुट जागा मिळावी. दिव्यांग कायदा २०१६ नुसार प्रत्येक स्वराज्य संस्था तसेच शासकीय विभागाने पाच टक्के इतका निधी खर्च करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सदर कायद्यानुसार संबंधित संस्थेच्या एकूण बजेटच्या पाच टक्के म्हणजेच २५ हजार रुपये कोटी इतकी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात यावी. दिव्यांगांकरिता संपूर्ण राज्यात फिरते विक्री केंद्र दिलेले आहे. त्यासाठी मिळालेली वाहने निकृष्ट दर्जाची आहेत. त्याऐवजी चांगल्या कंपनीच वाहने दिव्यांगांना वाटप करण्यात यावी.

दिव्यांग विद्यार्थ्यांकरता स्वाधार योजना लागू करण्यात यावी प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वयंरोजगाराकरिता स्टॉल देण्याचे धोरण तयार करून वाटप  करण्यात यावे. राज्यामध्ये दिव्यांगांची खोटी प्रमाणपत्रे काढून शासकीय नोकऱ्या मिळविणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची तपासणी करून या तपासणीत जे दोषी आढळतील,  त्या कोणी असोत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. आदि मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी प्रहार दिव्यांग आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे, मधुकर घाडगे व लक्ष्मीताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या संख्येने दिव्याग बांधव या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

यावेळीतालुका अध्यक्ष  लक्ष्मण अभंग सचिव प्रभाकर आव्हाड लक्ष्मण शिंदे, विठ्ठल घवले, सोहेल पठाण, अफसर पठाण, दत्तात्रय सबलस, फिरोज पटेल  सिद्धार्थ बटुळे योगेश हनवते यांच्यासह शहर व तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.