ज्यांना योजना समजल्या नाही, त्यांनी सल्ला देण्याची गरज नाही – ज्ञानेश्वर गव्हाणे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : शासनाच्या ज्या कल्याणकारी योजना चाळीस वर्षात कोल्हे कुटुंबाला सर्व प्रकारची सत्ता असतांना जनते पर्यंत पोहोचविता आल्या नाही. त्याची प्रचीती २०१४ ते २०१९ मध्ये पुन्हा एकदा मतदार संघातील जनतेला आली. त्यामुळे २०१९ ला जनतेने तुम्हाला नाकारत घरी बसविले व आ. आशुतोष काळेंकडे मतदार संघाची जबाबदारी दिली. ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली आहे.

त्यांना शासनाकडून निधी कसा मिळवायचा व त्यासाठी पाठपुरावा कसा करायचा हे अवगत आहे. त्यामुळे ज्यांना त्यांच्या कार्यकाळात निधी आणता आला नाही व ज्यांना योजनाच समजल्या नाही त्यांनी आ.आशुतोष काळेंना सल्ला देण्याची गरज नाही. असा उपरोधिक सल्ला अंजनापुरचे माजी सरपंच ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी मा.आ.कोल्हेंना लगावला आहे.

आपले अपयश झाकण्यासाठी अस्तीत्वहीन झालेल्या मा.आ. कोल्हे आपल्या कार्यकर्त्यांमार्फत आ.आशुतोष काळे यांच्यावर करीत असलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतांना ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात दीर्घकाळ कोल्हे कुटुंबाकडे सर्व प्रकारची सत्ता होती मात्र, जनतेच्या पदरात निराशाच पडली. जनतेला अपेक्षित असलेले विकासाचे प्रश्न सोडवायचे नाही.

त्या प्रश्नावर आपली राजकीय पोळी भाजून सत्ता उपभोगायची हि कोल्हेंची खासियत आहे. दुष्काळी गावातील नागरिकांना देखील त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याबाबत त्यांनी हेच केले आहे. त्यामुळे त्यांना दुष्काळी गावातील नागरिकांनी काळे झेंडे दाखवून, चले जाव देखील केले होते हे माजी आमदार कोल्हे विसरु शकतात. मात्र, जनता विसरत नाही हे त्यांनी समजून घ्यावे.

आपल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात आपल्याकडे असेलेल्या सर्व प्रकारच्या सत्ता त्या काळात झालेला मतदार संघाचा रखडलेला विकास व आ. आशुतोष काळे यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासाचे मूल्यमापन तुम्ही करूच शकत नाही कारण तुम्ही एवढा विकास कधीच करू शकत नाही. तुमच्याकडे ती मानसिकता देखील नाही. मात्र, आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या विकासाचे मूल्यमापन जनता करीत असून तुमच्यापेक्षा दहा पट निधी त्यांनी मिळविला आहे. तुम्हाला झालेला विकास दिसणार नाही कारण तुमच्या डोळयावर राजकारणाची पट्टी बांधलेली आहे.

त्यामुळे २०१४ ते २०१९ मध्ये शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळालेले एकूण लाभार्थी संख्या २ हजार १११ आहे व २०१९ नंतर चार वर्षात पात्र गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळालेल्या एकूण लाभार्थ्यांची संख्या जवळपास ०८ हजार ५३५ आहे म्हणजेच तुमच्यापेक्षा चार पट जास्त आहे. आ.आशुतोष काळे यांचे काम तुमच्या पेक्षा उजवे आहे. हे मतदार संघातील जनतेने मान्य केले आहे. मात्र, तुम्ही मान्य करू शकत नाही कारण तुम्हाला तुमचे अपयश झाकायचे आहे.

माजी आमदार कोल्हेंनी त्यांच्या कार्यकाळात जनतेला भरपूर वेड्यात काढले. मात्र, आता जनतेला वेड्यात काढायचे दिवस संपलेले आहेत. आ.आशुतोष काळे यांनी केलेला विकास जनतेने पहिला आहे व जनता या विकासाची साक्षीदार आहे. त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण करायचे काम त्यांनी बंद करून ज्यांना योजना समजल्या नाही त्यांनी आ.आशुतोष काळे यांना सल्ले देण्याची गरज नाही. असा सल्ला ज्ञानेश्वर गव्हाणे यांनी मा.आ.कोल्हेंना दिला आहे.