शेवगाव प्रतिनिधी, दि.२३ : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसह महायुती सरकारच्या कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याच्या कामात स्थानिक पातळीवर अंगणवाडी सेविका, मदतनिस आशा स्वयंसेविकांनी चांगले योगदान दिले आहे. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या पाठीमागे लाडक्या बहिणींनी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन गुजरात मधील आमदार प्रविण माली यांनी केले.
शेवगाव शहरातील आखेगाव रस्त्यावरील स्वराज मंगल कार्यालयामध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या पुढाकारातून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राबवणा-या महिलांचा गौरव कार्यक्रमामध्ये आमदार माली बोलत होते. यावेळी आमदार मोनिका राजळे, साहित्यीक संजय कळमकर, ज्येष्ठ नेते बापुसाहेब भोसले, तहसीलदार प्रशांत सांगडे, प्रभारी गटविकास अधिकारी अजितकुमार बांदल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संकल्प लोणकर, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी भाऊसाहेब गडदे, उमेश भालसिंग, आशा गरड, ताराचंद लोढे, भिमराज सागडे, सुजाता फडके, अलका सागडे,उषा कंगणकर, लता कोरडे आदीची मंचावर उपस्थित होती.
यावेळी माली म्हणाले की, हिंदवी स्वराज्य स्थापनेचे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराज यांना देवून तसे संस्कार करणा-या राजमाता जिजाऊ, घरातील माणसांच्या मृत्यूचे दु:ख बाजुला सारुन राज्यकर्त्यांच्या भुमिकेतून प्रजाहीताची कामे करणा-या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, पती निधनानंतर शहेनशाह अकबराच्या सैन्याला टक्कर देणारी राणी दुर्गावती, तसेच झाशीची राणी यांचे आतुलनीय युद्धकौशल्य, लहाणपणापासून आकाशात भरारी मारण्याचे पाहीलेले स्वप्न साकार करणारी कल्पना चावला, महिला शिक्षणासाठी झटणा-या सावित्रीबाई फुले यांची उदाहरणे देत आमदार माली यांनी महिलांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत आमदार राजळे यांनी पूर्वजन्मी चांगले काम केले असल्याने महिलांची सेवा करण्याची संधी तुम्हाला मिळाली. तुमच्या कार्यकाळात महिलांचा सन्मान करण्याचा मान आम्हाला मिळाला हे आमचे भाग्य आहे.
आमदार राजळे म्हणाल्या की, शेवगाव तालुक्यात ही योजना राबण्यासाठी पदाधिका-यांनी मोठा पुढाकार घेतल्याने तालुक्यात ६० हजार ५०० महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता ही योजना पुढे सुरु ठेवण्यासाठी महायुतीला मदत करा. असे आवाहन ही त्यांनी केले.
यावेळी कळमकर यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी ६०० महिलांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक भिमराज सागडे यांनी केले. तर कचरु चोथे यांनी आभार मानले.