भर पावसात कथा ऐकण्यासाठी श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती

शेवगाव प्रतिनिधी, दि. २३ : सद्यस्थितीत माणूस अपसेट आहे. तो सेट होण्यासाठी कथा, कीर्तनाच्या माध्यमातून त्याच्या शरीराची सर्विसिंग करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन शिवपुराण कथाकार समाधान महाराज शर्मा यांनी केले.

लोकनेते स्व . मारुतराव घुले पाटील यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त आयोजित महा शिवपुराण कथेचे पाचवे पुष्प रविवारी रात्री गुंफण्यात आले. रविवारी सायंकाळी साडेचार पासूनच शेवगाव मुसळधार पावसाला सुरवात झाली होती. तरीही श्रोत्यांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. संपूर्ण सभा मंडप वॉटरप्रुफ असला तरी कथास्थळी येतांना भाविकांचे पाय चिखलाने माखलेले असायचे, अनेक भाविक भिजतच कथास्थळी आले. त्यामुळे भाविकांची  बैठक मारून बसायची अडचण लक्षात घेऊन  घुले यांच्या सक्त आदेशानुसार नियोजन समितीने भर पावसात फर्निचरची दुकाने उघडवून व मिळतील तेथून अर्ध्या तासाच्या आत हजारो खुर्च्या उपलब्ध केल्या.

यावेळी बरसणाऱ्या पर्जन्य राजाला उद्देशून शर्मा महाराज म्हणाले महादेवाची कथा ऐकायला येथे साक्षात गंगा अवतरली आहे. सर्कस मधील कलाकारांना प्रेक्षकाच्या आनंदासाठी स्वतःची सुखदुःखे बाजूला ठेवून कसरती कराव्या लागतात. तद्वतच अध्यात्म क्षेत्रातील कथा, कीर्तनकारांनाही आपले दुःख बाजूला ठेवून समाजातील अवगुण दूर करण्यासाठी समाज प्रबोधन करावे लागते. गुरु प्राप्तीसाठी ईश्वरावर निष्ठा ठेवावी लागते, तुमच्या सोबत गुरु असल्यास काहीही कमी पडत नाही, उमा व कैलास संहिता कथेची श्रृंखला गुंफताना त्यांनी महिलांनी पतिव्रता धर्माचे पालन करण्याचे आवाहन केले.

आज  तारकेश्वर गडाचे महंत शांतिब्रह आदिनाथ महाराज शास्त्री, विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर, नेवासा येथील पैस खांब देवस्थानचे देविदास महाराज म्हस्के, माजी आमदार डॉ. नरेंद्र पाटील घुले , नूतन देशमुख, राजश्रीताई घुले, आ. आशुतोष काळे, चैताली काळे मंचावर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शिवपार्वती कॅलेंडरचे विमोचन करण्यात आले. महाराज मंडळींनी कथेच्या नेटक्या नियोजनाचे कौतुक करून घुले परिवाराला आशीर्वाद दिले. त्यानंतर  महाआरती झाली.