कोपरगांव प्रतिनिधी, दि. २३ : संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या व्हॉलीबॉल संघाने १९ वर्षे वयोगटांतर्गत तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये सलग तीन फेऱ्या जिंकुन कोपरगांव तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. सध्या तालुका व जिल्हा स्तरावरील विविध स्पर्धा होत असुन संजीवनी ज्यु. कॉलेजचे खेळाडू सर्वच ठिकाणी खिलाडूवृत्तीने खेळून आपल्या कौशल्यांच्या जोरावर मैदाने गाजवित आहेत, अशी माहिती संजीवनी कॉलेजच्या अधिकृत सुत्रांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर व तालुका क्रीडा समिती यांच्यामार्फत संजीवनी ज्यु. कॉलेजच्या भव्य मैदानावर या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यात संजीवनीच्या संघाने बाजी मारत अंतिम सामना जिंकला. आता हा संघ जिल्हा स्तरावर कोपरगांव तालुक्याचे नेतृत्व करणार आहे.
संजीवनीच्या व्हॉलीबॉल संघात सयम आनंद पहाडे, अलीमोहम्मद फिरोज शेख, आयुष पंकज शिंदे, ओम गणेश जगताप, अर्णव संतोष आव्हाड, यश सुरेश नरवडे, यश केलास जाधव, साई प्रविण धनवटे, नमन राजु शर्मा व साद शहेबाज पठाण यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. क्रीडा प्रशिक्षक प्रा. शिवराज पाळणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरावरही जिंकायचेच, या जिध्दीने सर्व खेळाडू सराव करीत आहेत.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंडगे व प्रशिक्षक प्रा. पाळणे यांचेही अभिनंदन केले.