काळेंनी हक्काचे पाणी व स्मार्ट सिटी घालवून महापाप केले – विवेक कोल्हे

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : कोपरगाव तालुक्याचं हक्काचं पाणी तसेच समृध्दी महामार्गाची स्मार्ट सिटी घालवून २५ हजार लोकांचा रोजगार घालवून काळेंनी महापाप केले आहे त्यामुळे त्यांना तालुक्यातील रोजगारावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. असा टोला आमदार आशुतोष  काळे यांना युवा नेते विवेक कोल्हे यांनी लगावला.

विवेक कोल्हे यांनी पञकारांशी संवाद साधताना म्हणाले, आमदार आशुतोष काळे यांनी तालुक्यातील बेरोजगारीवर कोल्हे यांच्यावर निशाणा साधत लक्ष केले होते त्यावर विवेक कोल्हे यांनी आमदार काळे यांच्यावर शाब्दिक पलट केला. यावेळी कोल्हे पुढे म्हणाले की, सध्या कोपरगाव  तालुक्यात ७० हजार सुशिक्षित बेरोजगारांची संख्या आहे. त्यांच्या हाताला काम नाही. आमदार आशुतोष काळे यांनी पाच वर्षात एकही रोजगार आणला नाही. गेली १४ वर्षे आमदारकी, ५ वर्षे खासदारकी काळे परिवाराकडे आहे. समन्यायी पाणी वाटपाच्या वेळी मौन बाळगून तालुक्याचे हक्काचे पाणी घालवून काळेंनी महापाप केले आहे. कुठलंही तळं बांधल्याने ते पाप धुतलं जाणार नाही

काळेंनी केलेल्या पापामुळे सध्या तालुक्यात  कोणताही उद्योग आणता येत नाही. बिगर पाण्यावर उत्पादीत करणाऱ्या कंपन्या आणाव्या लागत आहे. संजीवनीउद्योग समुहाच्या वतीने हजारो युवक युवतींना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. 

काळे १५ वर्षात सत्तेत असुनही एकही उद्योग आणला नाही. उलट तालुक्यात बेरोजगारीची संख्या वाढवली. तालुक्यात जर रोजगार धंदे  वाढवले असतील  तर ते दोन नंबर धंदेवाल्यांचे रोजगार वाढवले. त्यातून तालुक्याचे वाटोळे होत आहे. तेव्हा आमदार काळे यांनी इतरांवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्याची भाषा करू नये उलट आमदार काळे वर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करायला पाहीजेत. कारण ३ हजार कोटींच्या विकास कामांच्या फक्त वल्गना झाल्या माञ जमीनीवर कुठलेही काम दिसत नाही. खोटारडेपणाचा कळस झालेला आहे. यामुळे आता कोपरगावकरच काळे यांच्यावर फसवणुकीचा दावा टाकल्या शिवाय स्वस्थ बसणार नाहीत असा आरोप विवेक कोल्हे यांनी आमदार काळे यांच्यावर केला आहे.