शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील गेल्या आठ दिवसापासुन अंतरवली सराटी येथे उपोषणास बसले आहेत. शेवगाव तालुक्यातून ठीक ठिकाणाहून त्यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील बोधेगांवात काल कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाने बंदची हाक दिली होती. बंद शंभर टक्के यशश्वी झाला. सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवुन बंद मध्ये सामील झाले होते.
दरम्यान जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिबा देण्यासाठी हभप परशुराम महाराज विखे यांनी येथील मारुती मंदीरा जवळ उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांचीही प्रकृती खालावली आहे. विखे यांच्या उपोषणालाशेवगांव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, माजी जिप सदस्य नितीन काकडे, हर्षदा काकडे, बोधेगांव प्रेस क्लब, सकल मुस्लीम समाज, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांनी भेट देवुन पाठिंबा दिला आहे.
तर ग्रामपंचायत बोधेगांव लाडजळगांव, बालमटाकळी, अंतरवली खु. सोनाविहीर, गायकवाड जळगाव, या गावच्या ग्रामपंचायतींनी ठराव करून पाठिंबा दिला आहे. तर भातकुडगाव फाट्यावर दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मराठा सेवक चंद्रकांत महाराज लबडे, राजेंद्र आढाव पाटील, रामजी शिदोरे, अशोक देवडे यांच्या हस्ते तहसीलदार प्रशांत सांगडे यांना निवेदन देण्यात आले.