शेवगाव प्रतिनिधी, दि. २८ : शेवगाव सारख्या दुष्काळी तालुक्यातील शेतक-यांना न्याय देण्यासाठी लोकनेते स्व. मारुतराव घुले यांनी बाजार समितीची पायाभरणी केली. माजी आमदार नरेंद्र पाटलांच्या मार्गदर्शनाखाली कायम शेतकरी हितास प्राधान्य देतांना इतर बाजार समितीच्या तुलनेत शेतीमालास चांगला भाव देण्याचा प्रयत्न केला.
शेवगाव मुख्य आवाराबरोबरच त्या त्या भागातील बोधेगाव, बालमटाकळी व शहरटाकळी या उप आवारात ही मुलभूत सोयीसुविधा निर्माण करुन दिल्या असल्याने शेवगाव बाजार समितीचा राज्यात लौकिक आहे. लवकरच येथील कांदा मार्केटमध्ये मोकळ्या कांद्याची खरेदी देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती माजी आ.चंद्रशेखर घुले यांनी दिली.
शेवगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज शनिवारी (दि.२८ ), लोकनेते मारुतराव घुले पाटील शेतकरी भवनामध्ये पार पडली यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ होते. यावेळी ज्येष्ठ नेते काकासाहेब नरवडे, संजय कोळगे, संजय फडके, बबनराव भुसारी, उपसभापती गणेश खंबरे, कल्याण नेमाणे, मंगेश थोरात, नानासाहेब मडके, पुरुषोत्तम धुत आदी प्रमुख उपस्थित होते.
प्रास्ताविकामध्ये सभापती एकनाथ कसाळ यांनी बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात ९६ हजार ७२४ क्विंटल भुसार मालाची तसेच दोन लाख ८८ हजार ३७५ क्विंटल कांदा, तीन लाख ३६ हजार ८८९ क्विंटल कापूसाची आवक झाली. याशिवाय एक लाख ४८ हजार ५५ जनावरांची खरेदी-विक्री झाली असून अहवाल सालात बाजार समितीचे एकूण उत्पन्न तीन कोटी ३२ लाख २० हजार ४४८ रुपये झाले. त्यापैकी दोन कोटी ६५ लाख ६० हजार ५९० रुपये खर्च झालेला असून बाजार समितीला ६६ लाख ५९ हजार ८५८ रुपयांचा निव्वळ नफा मिळाल्याचे वार्षिक अहवालात सांगितले.
व्यापारी मनोज तिवारी, प्रदिप काळे यांनी व्यापारी व हमालांच्या समस्या मांडल्या. यावेळी धान्याच्या गोणीमध्ये सापडलेले दागिने शेतक-याला परत केल्याबद्दल सचिन म्हस्के, गणेश म्हस्के, गणेश तांबे, नवनाथ रेवंडकर आदी हमालांचा घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बाजार समितीमध्ये सुलभ शौचालय बांधावे, मोकळा कांदा मार्केट सुरू करावे, बाजार समितीच्या प्रांगणातील पूर्वेकडील ७५ व्यापारी संकुलाच्या पहिल्या मजल्याचे काम सुरू करण्यात यावे, उपबाजार बोधेगाव येथे पेट्रोल पंपाची उभारणी करण्यात यावी आदी प्रस्ताव संमत करण्यात आले. सचिव अविनाश म्हस्के यांनी अहवाल वाचन केले. सुत्रसंचालन बाजार समितीचे संचालक संजय कोळगे यांनी तर राहुल बेडके यांनी आभार मानले.
0