कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०२ : कोपरगाव तालुक्यात दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे नागरिकांचे व जनावरांचे पिण्याच्या पाण्याअभावी हाल होत असून, खरीप पिकेही धोक्यात आली आहेत. निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील ११ गावांमध्येदेखील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने निळवंडे धरणातून डाव्या कालव्यात ओव्हरफ्लोचे पाणी तात्काळ सोडण्यात यावे, अशी आग्रही मागणी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहललता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या कोपरगाव तालुक्यातील ११ गावांच्या लाभक्षेत्रातील वितरीका बंद पाईपलाईनऐवजी खुल्या पध्दतीने कराव्यात आणि हे काम टेलपासून तातडीने सुरू करावे, अशीही मागणी कोल्हे यांनी केली आहे.
स्नेहललता कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे की, गेली ५३ वर्षे रखडलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील, अकोले तालुक्यात असणाऱ्या निळवंडे धरणाचे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) काम भाजप-शिवसेना युती सरकारमुळे मार्गी लागले असून, डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी ३१ मे २०२३ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झालेली आहे. ८.३२ टीएमसी क्षमतेचे निळवंडे धरण अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला वरदान ठरणार आहे.
या प्रकल्पावर डावा कालवा, उजवा कालवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजना असे चार कालवे आहेत. त्यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या तालुक्यातील १८२ गावांमधील एकूण ६८८७८ हेक्टर (१ लाख ७० हजार २०० एकर) शेतजमीन ओलिताखाली येणार आहे. डावा कालवा ८५ किलोमीटर तर उजवा कालवा हा ९७ किलोमीटर लांबीचा आहे. डाव्या कालव्याच्या माध्यमातून लाभक्षेत्रातील ११३ गावांतील ४३ हजार ८६५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
कोपरगाव तालुक्यातील जवळके, रांजणगाव देशमुख, बहादरपूर, अंजनापूर, वेस, सोयगाव, बहादराबाद, धोंडेवाडी, शहापूर, काकडी, मल्हारवाडी या ११ गावांचा समावेश असून, या जिरायत भागातील सुमारे १३ हजार ९९६ एकर (५ हजार ६६६ हेक्टर क्षेत्र) निळवंडे धरणामुळे ओलिताखाली येणार आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी जिरायत भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे काम तातडीने पूर्ण करावे आणि निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात कोपरगाव तालुक्यातील वरील ११ गावांचा समावेश करावा, यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नामुळेच निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रात कोपरगाव तालुक्यातील ११ गावांचा समावेश झाला आहे.
निळवंडे धरणातून डाव्या कालव्याद्वारे कोपरगाव तालुक्यातील ११ गावांसाठी बंद पाईपलाईनमधून शेतीसाठी पाणी देण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र, निळवंडे धरणाच्या लाभक्षेत्रातील शेती ही कोरडवाहू असल्याने या भागात बंद पाईपलाईनद्वारे पाणी न देता जमिनीवर वितरीका खोदून प्रचलित पध्दतीने म्हणजेच खुल्या पध्दतीने शेतकऱ्यांना पाणी देण्यात यावे. परिणामी सदर पाण्याचा पाझर होऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढून सभोवतालच्या नागरिकांना व जनावरांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे निळवंडे धरण डाव्या कालव्याच्या वितरीका तसेच चाऱ्यांची-पोटचाऱ्यांची कामे तात्काळ टेलपासून सुरू करावीत.
कोपरगाव तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस नाही. आतापर्यंत तालुक्यात झालेल्या पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षाही अगदीच नगण्य आहे. त्यामुळे नागरिकांचे व जनावरांचे पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. तसेच चारा व इतर पिकेही पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. ही बाब लक्षात घेऊन तात्काळ निळवंडे धरणातून उर्ध्व प्रवरा डाव्या कालव्यात ओव्हरफ्लोचे पाणी कोपरगाव तालुका लाभक्षेत्रात सोडण्यात यावे, जेणेकरून भूगर्भात पाण्याची पातळी वाढून त्याचा फायदा पिकांना होईल व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. या दोन्ही मागण्यांबाबत संबंधित यंत्रणेस त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.