शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आदर्श गाव वाघोलीचे प्रणेते , युवा कार्यकर्ते उमेश भालसिंग यांची निवड करण्यात आली आहे. निगडी पुणे येथील ग.दी. माडगुळकर सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी याबाबतच्या निवडीचे पत्र भालसिंग यांना दिले. यावेळी युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील व योगेश मैड आदी उपस्थित होते.
उमेश भालसिंग हे सन २०१४ पासून आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षामध्ये सक्रीय असून यापूर्वी त्यांनी भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा कार्यकारीणीत, तसेच उपाध्यक्ष व सरचिटणीस म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. भालसिंग यांच्या नेतृत्वाखाली वाघोली ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियानात सलग दोन वर्ष राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केला आहे. जलसंधारण, वृक्षारोपन, शिक्षण , आरोग्य व कृषी या क्षेत्रात ही त्यांचे मोठे योगदान आहे. या निवडीबद्दल आ . राजळे, देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजीत कदम आदींनी अभिनंदन केले.
यावेळी भालसिंग म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील राष्ट्र उभारणी करण्यासाठी पक्षाच्या युवा मोर्चामध्ये गेल्या सहा वर्षापासून विविध पदावर काम करत आहे. पक्षामध्ये तळमळीने काम करणा-या कार्यकर्त्यांना नेहमीच संधी मिळत असल्याने जिल्हयातून प्रदेश पातळीवर काम करण्याची जबाबदारी पक्षाने दिली आहे. पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी व आगामी विधानसभेच्या दृष्टीने अधिक जोमाने काम करु.