दसऱ्यानंतर आखाड्यात उतरणार – बिपीन कोल्हे

कोल्हे परिवारांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगाव विधानसभा मतदार संघात काळे कोल्हे यांची राजकीय लढत सर्वश्रुत आहे. राज्यात कोणताही पक्ष सत्तेत आला किंवा कोणत्याही राजकीय पक्षांची युती झाली तरीही कोपरगाव मध्ये काळे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष अटळ असतो.  सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत  आमदार आशुतोष काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे उमेदवार होते तर माजी आमदार स्नेहलता कोल्हे ह्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या. या निवडणुकीत कोल्हे यांचा निसटता पराभव झाला तर आमदार आशुतोष काळे विजयी झाले.

सुदैवाने आमदार आशुतोष काळे हे सत्ताधारी पक्षाचे आमदार झाले. ठाकरेंची सेना, काॅंग्रेस व राष्ट्रवादी पक्ष एकञ येवुन महाविकास आघाडी स्थापन केली. भाजपला सत्तेतून बाजुला सारत सत्ता काबीज केली पुन्हा आडीज वर्षात अनपेक्षित राजकीय भूकंप झाला आणि भाजपने फोडाफोडीचे राजकारण करुन सत्तेची चावी आपल्याकडे खेचली त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार अजित पवार यांच्या बरोबर भाजपशी हातमिळवणी करुन सत्तेचे वाटेकरी झाले. सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार काळे ही अजित पवार यांच्यासमवेत सामिल झाले आणि कोपरगावच्या राजकारणाचे समिकरण बदलले.

पारंपरिक विरोधक असलेल्या काळे-कोल्हेंना महायुतीचे घटक म्हणून एकञ येण्याची वेळ आली. दोघेही नेरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचारधारेला अनुसरून राजकारण करण्याची वेळ आली. काही दिवसांनंतर कोल्हे परिवार भाजप पासुन दूर कसा होईल असा प्रयत्न जिल्ह्यातील एक बड्या नेत्याने केला. अशातच कोल्हे यांची नाराजी बड्याबद्दल वाढू लागली. ते भाजप पासुन दूर जाणार का? माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कोल्हे परिवाराशी जवळीकता साधत असल्याने व पालकमंत्री यांच्या विरोधात थोरात यांचे राजकीय वैर वाढल्याने कोल्हे-थोरात एकञ आल्याचे बोलले जात होते. पण कोल्हे परिवाराने भाजपासुन वेगळे झालो असं कधीच जाहीर केले नाही. उलट लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला.

कोल्हेंची काहीशी नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे अनेक मंञी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. काहीतरी शब्द दिला असावा पण पुन्हा विवेक कोल्हे नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून दुसऱ्या पसंतीचे मतं घेतल्याने कोल्हे यांनी राज्याचे लक्ष वेधले. आता पुन्हा विधानसभेचे निवडणूक लागणार आहे. अशातच सेना भाजप व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने नवा फाॅर्म्युला काढला असुन ज्या पक्षाचे विद्यमान आमदार असतील त्यांना त्या त्या पार्टीचे तिकीट देणार असल्याची चर्चा सुरु झाली आणि भाजपचे कोल्हे यांची राजकीय कोंडी झाली. अनेक दिवसांपासून कोल्हे यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागुन राहिली आहे. 

 कोल्हे कधी आपली भूमिका स्पष्ट करतात याची उत्सुकता शिगेला पोहचली असताना शनिवारी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी  कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलताना  म्हणाले की, दसऱ्यानंतर आपण आखाड्यात उतरणार आहोत.‌ सध्या कोणाचं काय कोणाचं काय सुरु आहे. दसऱ्या नंतर बरंच काही स्पष्ट होईल दसऱ्यानंतर आपण विरोधकांचा समाचार घेण्याबरोबरच आपल्या न्याय हक्कासाठी आखाड्यात उतरणार असे बोलताच उपस्थित जनसमुदायांनी टाळ्यांचा कडकडाट करीत बिपीन  कोल्हे  यांना प्रतिसाद दिला. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांनी भर सभेत केलेल्या एका वक्तव्याचा मतदार संघात चर्चेचा विषय झाला. 

 कोल्हे परिवार भाजप बरोबर कायम राहणार की, हातात हात घालुन मशाल पेटवणार, शरद पवार यांची तुतारी वाजवणार? राज्याच्या राजकीय हालचाली सध्यातरी गुलदस्त्यात असल्याने कोपरगाव मतदार संघातील काळे-कोल्हे यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोल्हे यांनी दसऱ्यानंतर कोणती भूमिका घेतात यावरून राजकीय उलथापालथ विसंबून आहे. 

 सध्यातरी कोल्हे परिवार भाजपशी जवळीकता बाळगून आहे. कोल्हे साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या वार्षीक अहवाल पुस्तिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंञी अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे सहकार मंञी दिलीप वळसे पाटील यांचे फोटो होते यावरुन आजही कोल्हे परिवार महायुतीत असल्याचे दिसत आहे. जर काही राजकीय उलथापालथ झाली तर कोल्हे दसऱ्यानंतर कोणता नवा आखाडा निर्माण करून नवा खेळ खेळतात कि, जुन्या आखाड्यात उतरुन जुन्या खेळीला नवा रंग देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  कोण कोणत्याही राजकीय पक्षात गेले तरी कोपरगाव मध्ये सरळ लढत फक्त  काळे विरुद्ध कोल्हेच होणार!