शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे खिचडी बंद आंदोलन

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : शालेय पोषण योजना केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळा येथील इयत्ता १ ते८ वी पर्यतच्या विद्यार्थ्यासाठी चालविली जाते. या योजनेत काम करणारे कर्मचारी हे अतिशय कमी मानधनावर काम करत आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सम्यक फाऊंडेशन प्रणित श्रमिक मजदुर संघ शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना कार्यरत असून या संघटनेच्या वतीने दि. ४ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे नवीन मेनुचा विरोध करण्यासाठी आणि मानधनात वाढ करावी यासाठी जिल्हाभरात खिचडी बंद आंदोलन केले जाणार आहे असे संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा सविता विधाते यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

शालेय पोषण आहार कर्मचारी यांना दरमहा फक्त २५०० रुपये इतके तुटपुंजे मानधन मिळते आणि या बदल्यात त्यांना शालेय परिसर, वर्ग आणि स्वच्छ्ता गृह साफसफाई करून आहार शिजवावा लागतो. त्याशिवाय आता तीन प्रकारचा आहार शिजवावा लागत आहे. दोन आठवड्याचे आहार नियोजन असून तो आहार करावा कसा असा प्रश्न कर्मचाऱ्यांसह शिक्षकांना सुध्दा पडलेला आहे.

अशा या पद्धतीचा विरोध करण्यासाठी संघटनेच्या वतीने खिचडी बंद आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील प्रत्येक शाळेतील कर्मचारी यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य समन्वयक सुभाष सोनवणे, कैलास पवार, उत्तम गायकवाड, शितल दळवी, कावेरी साबळे यांनी केले आहे. निवेदनावर जिल्हा सचिव विद्या अभंग, जिल्हा कोषाध्यक्ष मेजबिंन सय्यद आदींच्या सह्या आहेत.