कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३१ : श्रीराम नवमीनिमित्त कोपरगाव शहरातून शिर्डीला जाणाऱ्या मुंबादेवी तरुण मंडळाच्या श्री साई गाव पालखीचे विधिवत पूजन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.
पालखी पूजनानंतर त्यांनी श्री साई पालखीत सहभागी होऊन साईभक्तांचा उत्साह वाढविला. तसेच साईभक्तांना श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, शिर्डी येथे श्री साई गाव पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांना संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर समृद्धी महामार्ग सर्कल येथे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते सुगंधित दूध वाटप करण्यात आले. या ठिकाणी संजीवनी युवा प्रतिष्ठानने उभारलेला साई परिक्रमेचा नयनरम्य देखावा खास आकर्षण ठरला. हजारो लहान-मोठ्या नागरिकांना या देखाव्याने भुरळ घातली होती.
श्रीक्षेत्र शिर्डी येथे दरवर्षी श्रीराम नवमी उत्सव अर्थात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात येतो. श्री साईबाबांच्या हयातीत सुरू झालेली श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अखंड चालू आहे. यानिमित्त दरवर्षी राम नवमीच्या दिवशी साई गाव पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. राम नवमीच्या दिवशी कोपरगाव व पंचक्रोशीसह राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने पालख्या शिर्डी नगरीत श्री साईबाबांच्या भेटीला येत असतात.
सोबतच असंख्य भाविक पायी चालत शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात. कोपरगाव येथील मुंबादेवी तरुण मंडळातर्फे गेल्या २९ वर्षांपासून राम नवमीच्या दिवशी श्री साई गाव पालखी सोहळ्याचे आयोजन करून कोपरगाव ते शिर्डीपर्यंत पालखी नेली जाते. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने कोपरगाव शहरातून वाजतगाजत श्री साई पालखी काढण्यात आली. युवा नेते विवेक कोल्हे यांनी या पालखीचे विधिवत पूजन करून मनोभावे दर्शन घेतले. त्यांनी स्वत: या पालखीत सहभाग घेतला. नंतर ही पालखी श्री साईबाबांच्या भेटीसाठी शिर्डीकडे रवाना झाली.
कोपरगावहून नगर-मनमाड महामार्गावरून शिर्डीला निघालेल्या श्री साई गाव पालखीसोबत हजारो स्री-पुरुष भाविक-भक्त पायी चालत होते. साई परिक्रमेसाठी शिर्डीला निघालेल्या या भाविकांना संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने नगर-मनमाड महामार्गावर समृद्धी महामार्ग सर्कल येथे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सुगंधित दुधाचे वाटप करून सर्वांना राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच भाविकांसोबत नृत्य करत त्यांचा उत्साह वाढवला. शिर्डी येथे श्री साई परिक्रमेसाठी व पालखी सोहळ्यासाठी गेलेल्या हजारो भाविकांनी या सुगंधित दुधाचा आस्वाद घेतला आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सामाजिक लोकोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले. यावेळी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक, संजीवनी उद्योग समूहाशी संलग्न विविध संस्थांचे पदाधिकारी, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे आजी-माजी संचालक, नगरसेवक, भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजीवनी युवा प्रतिष्ठान गेल्या आठ वर्षांपासून ‘जागवूया ज्योत माणुसकीची’ या ब्रीदवाक्यानुसार सामाजिक, कृषी, आरोग्य, पर्यावरण आदी क्षेत्रात विविध नावीन्यपूर्ण विधायक उपक्रम राबवत आहे. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक सामाजिक बांधिलकी जोपासत निस्वार्थी भावनेने अविरत समाजसेवा करीत आहेत. हाच पायंडा पुढे चालवत विवेक कोल्हे व युवा सेवकांनी राम नवमीनिमित्त शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी आणि साई परिक्रमेसाठी जाणाऱ्या भाविकांना सुगंधित दुधाचे वाटप केले. कोपरगाव ते शिर्डी मार्गावर पडलेला कचरा गोळा करून साफसफाई केली आणि जनसेवा हीच ईश्वरसेवा आहे, हे दाखवून दिले. त्यांच्या या उपक्रमाचे भाविकांनी कौतुक करून युवा सेवकांना धन्यवाद दिले. शिर्डीला गाव पालखीसोबत निघालेल्या अनेक वयोवृद्ध आजी-आजोबांनी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या सामाजिक, विधायक कार्याची प्रशंसा करून त्यांना आशीर्वाद दिले.