कोपरगावच्या विकासाला साथ द्या, राजकारणाचा अड्डा करु नका – स्नेहलता कोल्हे

कोपरगावच्य मान्यवरांचा नागरी सत्कार संपन्न

 कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० : कोपरगाव हे स्वाभीमानाचं केंद्र आहे. संस्कार व संस्कृतीचा वारसा आहे. राजकीय प्रगल्भता सर्वांमध्ये आहे. त्यामुळे कोणीतरी याव आणि काहीतरी बोलुन वातावरण दुषित करू नये. कोपरगावच्या विकासाला साथ द्या, परंतू राजकारणाचा अड्डा करु नका. असे मत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केले.

नागरी सत्कार समिती कोपरगाव यांच्यावतीने ‘आमचा मान आमचा अभिमान’ म्हणुन विविध क्षेञात पुरस्कार प्राप्त व निवड झाल्याबद्दल आयुर्वेदाचार्य महागुरू डॉ. रामदास आव्हाड, जलतरण व धाव पट्टू डॉ. सुषमा विलास आचारी, जैन समाजाचे सच्चे सेवक, डॉ. अभय दगडे, कोपरगाव पिपल्स बॅंकेचे चेअरमन राजेंद्र शिंगी, कोपरगाव मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल काले, उपाध्यक्ष राजेश ठोळे यांचा विशेष नागरी सत्कार समारंभ माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार स्नेहलता कोल्हे होत्या. यावेळी विवेक कोल्हे, रविंद्र बोरावके, डॉ. अजय गर्जे, डॉ. गोवर्धन हुसळे, संजय सातभाई, सुहासिनी कोयटे, केशव भवर, प्रसाद नाईक, मुनीष ठोळे, माधव देशमुख, पराग संधान, राजेंद्र शिंदे, दिपक विसपुते, वसंत आव्हाड, डॉ. राजेश श्रीमाळी आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केशव भवर यांनी केले.

स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, महिला मंडळ ते विधीमंडळात हा माझा प्रवास थक्क करणारा आहे. मतदार संघाची पहीली महीला आमदार होण्याचा मान मला कोपरगावकरांनी दिला, माझ्यावर मोठे ऋण आहेत ते मी कधीच विसरणार नाही. मी आमदार असताना जितके विकास कामे केले तितकेच आजही करते. कोपरगावसाठी नविन बसस्थानक, पालिकेची नवी इमारत, वाचनालय, अग्निशमन दलाची इमारत, गोकुळनगरीचा पुल, पंचायत समितीसाठी इमारत, पोलीस स्टेशनच्या इमारतीसह विविध विकास कामांचा डोंगर उभा केला. काही कामांना निधी उपलब्ध करुन दिला. बंदीस्त नाट्यगृह मंजुर केले, पण दुर्दैवाने निधी दुसरीकडे वळवला. अनेक कामातून विकास साधण्याचा मी जरी प्रयत्न केले. तरीही मी एक महिला म्हणुनच एक खंत कायम मनात राहिली ती म्हणजे कोपरगाव शहराला दररोज शुध्द पाणी मिळू शकले नाही. 

निळवंडेचे स्वच्छ पाणी मंजूर झाले. फुकट पाणी मिळत होते, पण दुर्दैवाने राजकारण आडवे आले. त्यामुळे मला कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या संघर्ष करावा लागला. मी रडणारी नाही लढणारी असल्याने माझा संघर्ष अजुनही सुरूच आहे. पाण्याचं काम हे पुण्याचं काम आहे. तेव्हा पाण्याचं काम  आमदारांनी करो अथवा कोणीही करो पण अडथळा नको आहे. जर तालुक्याला योग्य रस्ते, सुरळीत विज व मुबलक पाणी मिळाले तर सर्वजन भक्कमपणे उभे राहतील बाजारपेठ कायम आपलीच राहील. कोपरगाव हे शिक्षणामध्ये अग्रभागी आहे. ग्रामीण भागातील पहिले काॅलसेंटर येथे आहे. जगभरात कोपरगावचे मुलं काम करत आहेत.

हजारो मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पण ज्यांनी कधी दोन माणसांना रोजगार दिला नाही. अशा लोकांनी आमच्यावर टीका करणे हे दुर्दैव आहे. स्व. सुर्यभान वहाडणे, स्व. बाळासाहेब विखे, स्व. शंकरराव कोल्हे, स्व. शंकरराव काळे, स्व. ना.स.फरांदे, स्व. भिमराव बडदे यांनी त्यांच्या परीनं  जे करता येईल ते समाजाचं चांगलं कार्य करून योगदान दिले गेले. माञ, त्यांचा उध्दार करणे योग्य नाही. अशी खंत कोल्हे यांनी व्यक्त करीत विरोधकांचे लक्ष वेधले.

यावेळी विवेक कोल्हे म्हणाले की, कोपरगावकरामध्ये सर्व क्षमता आहे सर्व क्षेञातील लोक तितक्याच तोलामोलाचे आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात कोपरगावचे नावलौकिक आहे फक्त एकीची कमी आहे. जर सर्वांनी एक दिलाने एक विचाराने कोपरगावच्या विकासासाठी एकवटलो तर कोपरगाव हे राज्याचे प्रमुख शहर म्हणून ओळख निर्माण होईल. आजचे सत्कारमूर्ती यांनी हे सिध्द करुन दाखवले आहे. त्यांच्यापासून सुरुवात झाली आहे. आपणही हातभार लावूया, येणारा काळ कोपरगावसाठी सुवर्ण काळ आहे. कोपरगाव शहराच्या जवळच तिन विमानतळ, मोठे रेल्वेस्थानक, चार मोठ्या जिल्ह्यांच्या अगदी जवळुन जोडणारं मुख्य केंद्र कोपरगाव आहे. कोपरगावमध्ये टेक्नाॅलाॅजी व ट्रेडिंग, शिर्डी मध्ये टूरिझम तर येवल्यमध्ये टेक्सटाइल असल्याने ट्रीपल टी आहे.

सर्व सत्कारमूर्ती यांनी कोपरगावचे नाव देशपातळीवर चमकवले आहे. आपणही आता हातभार लावला पाहिजे. कोपरगावचा राजकीय दबदबा राज्यात होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे नेहमी काळे, कोल्हे यांचा आदर्श सांगत होते. विकास कोण्या एकामुळे होतं नाही त्यासाठी सर्व क्षेञातील मान्यवरांनी योगदान दिले पाहिजे, असे ही ते म्हणाले. 

यावेळी सत्कारमूर्ती राजेश ठोळे यांनी कोपरगावच्या विकासाची दिशा व दशा आपल्या मनोगतातून सांगितले. आपण कोपरगावकरांमुळे घडलो म्हणुनच देशभरात माझा सन्मान होतोय असे मत डॉ. रामदास आव्हाड यांनी व्यक्त केले. यावेळी  सत्कारमूर्ती डॉ.अभय दगडे, डॉ. सुषमा आचारी, डॉ.विलास आचारी यांनी आपले मत व्यक्त करीत ऋण व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जाधव यांनी केले तर उपस्थितांचे आभार पराग संधान यांनी व्यक्त केले.