खेळ पैठणीचा कार्यक्रमास महिलांचा उदंड प्रतिसाद
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०८ : महिला आणि महिलांचे प्रश्न हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जनतेच्या पाठिंब्यामुळे मी कोपरगाव मतदारसंघात कोट्यवधीची अनेक विकास कामे केली. गोरगरिबांचे अश्रू पुसले. राजकारणात काम करताना अनेक अडचणी येतात; पण त्यावर मात करत नि:स्वार्थी भावनेने माझे समाजकार्य व मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम सुरूच आहे. महिला सक्षमीकरणासाठी व समाजासाठी मी माझे आयुष्य वाहून घेतले आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत, रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत हे कार्य अखंड सुरूच राहील. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्नेहलता कोल्हे यांची जबरदस्त क्रेझ पहावयास मिळाली. कोल्हे यांची प्रचंड लोकप्रियता व त्यांनी केलेल्या विकासकामांमुळे त्या आता कोपरगावच्या पर्मनंट आमदार राहतील, अशा शुभेच्छा सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर यांनी दिल्या. कार्यक्रमस्थळी लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यातील भाग्यवान विजेत्या महिलांना स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते पहिले बक्षीस फ्रीज, दुसरे बक्षीस वॉशिंग मशीन, तिसरे बक्षीस मायक्रो ओव्हन, चौथे बक्षीस एलईडी टीव्ही, पाचवे बक्षीस मिक्सर तसेच ११ पैठणी व १३१ आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यावेळी येसगाव येथील महिला बचत गटाच्या कार्यकर्त्या, योग प्रसारक संस्था, विविध महिला मंडळे, सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने स्नेहलता कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. स्नेहलता कोल्हे यांचे ह्रदयस्पर्शी मनोगत ऐकून उपस्थित सर्वांचा त्यांच्याबद्दलचा आदरभाव आणखी वृद्धिंगत झाला.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या भाग्यविधात्या, प्रथम महिला आमदार व भाजप नेत्या स्नेहलता बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त खास महिला-भगिनींसाठी संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने शनिवारी (७ ऑक्टोबर) कोपरगाव शहरातील तहसील कार्यालयाशेजारी असलेल्या मैदानात सिने अभिनेते क्रांती नाना मळेगावकर यांचा ‘न्यू होम मिनिस्टर-खेळ रंगला पैठणीचा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्या बोलत होत्या. कोपरगावात पहिल्यांदाच झालेल्या या सुंदर सोहळ्याला उदंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी स्नेहलता कोल्हे यांच्या जीवनकार्यावर व त्यांनी केलेल्या विकास कामांवर आधारित माहितीपट दाखविण्यात आला. माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट करीत, फटाक्यांच्या आतषबाजीत स्नेहलता कोल्हे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भलामोठा पुष्पहार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला. या सन्मानाबद्दल स्नेहलता कोल्हे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास कलावती नितीन कोल्हे, सरिता देशमुख, मनाली अमित कोल्हे, रेणुका विवेक कोल्हे, श्रद्धा ईशान कोल्हे, कोल्हे कुटुंबीय आदींसह सर्व वयोगटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
क्रांती नाना मळेगावकर यांचे खुमासदार निवेदन व सूत्रसंचालन, गप्पा-गोष्टी, उखाणे, चित्रपट गीते, लावणी, लोकगीते, भक्तिगीते, प्रश्नोत्तरे, नृत्य, फुगा फोडणे, तळ्यात मळ्यात व इतर विविध मनोरंजक खेळ यामुळे हा कार्यक्रम उत्तरोत्तर चांगलाच रंगत गेला. महिलांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. स्वत: स्नेहलता कोल्हे यांनी महिलांसोबत ‘जवा बघतीस तू माझ्याकडं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय’ या गाण्यावर ठेका धरला. प्रारंभी मिमिक्री कलाकार संदीपकुमार जाधव यांनी ‘घटकाभर बसा अन् पोटभर हसा’ हा बहारदार कार्यक्रम सादर केला.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, महिला मंडळ, महिला बचत गटाचे काम करत-करत आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी विधिमंडळात पोहोचले. मतदारसंघातील अनेक विकास कामे मार्गी लावली. महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी कार्य करत असताना माजी मंत्री स्व. शंकररव कोल्हे, श्सिंधु (माई) कोल्हे, बिपीन कोल्हे व कुटुंबीयांच्या प्रोत्साहनामुळे मी राजकारणात आले. कोपरगावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले; पण काही कोत्या मनोवृत्तीच्या लोकांनी कोर्ट केसेस केल्या, राजकीय अडथळे आणले. तरीही पाणी व इतर विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम कार्यरत राहीन. मतदारसंघातील माता-भगिनींनी व नागरिकांनी मला भरभरून प्रेम दिले. हे प्रेम मी कधीही विसरणार नाही. यापुढील काळातही मतदारांनी व माता-भगिनींनी मला अशीच साथ कायम द्यावी. आपल्या सर्वांच्या सहकार्याने मी संघर्षाचा रस्ता निश्चितच पादाक्रांत करीन.
मी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांमध्ये आत्मविश्वास जागृत केला, महिलांना बचतीची सवय लावून त्यांना बँक व्यवहाराची माहिती करून दिली. उंबऱ्याच्या आत अडकलेल्या माता-भगिनींना घराबाहेर काढून आर्थिक चौकटी मोडून समाजाच्या प्रवाहात आणले. महिला बचत गट चळवळीच्या माध्यमातून महिलांचे अनेक प्रश्न सोडविले. ‘आपल्याला रडायचे नाही तर लढायचे आहे’, असा संदेश देत स्त्रीशक्तीचा जागर केला. विधवा, परित्यक्ता महिलांना सन्मान देऊन त्यांना सोबत घेऊन काम करण्याचा विचार दृढ केला. आज महिला कोणत्याही क्षेत्रात कमी नाहीत. महिला काकणभर सरसच आहेत. महिलांचे कार्य हे मल्टी टास्किंग आहे. त्यांचा त्याग खूप मोठा आहे. दिवस-रात्र अपार कष्ट करून कुटुंबाचा गाडा ओढण्याबरोबरच कुटुंबातील सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचे काम महिला करत असतात.
माता-भगिनींकडे माणुसकीच्या नात्याने पाहून त्यांना सन्मानाची वागणूक द्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना त्यांच्यातील सुप्त कलागुण सादर करता आले. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून मला खूप आनंद झाला आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद मोदी यांनी नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर करून महिलांना लोकसभा व विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतल्याबद्दल स्नेहलता कोल्हे यांनी त्यांचे मन:पूर्वक आभार मानले. एकीचे बळ फार मोठे आहे. स्त्री हे शक्तीचे रूप आहे. कोणतीही महिला अबला नाही. मीच राणी लक्ष्मीबाई, मीच जिजाऊ, मीच सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी संघटित होऊन आत्मविश्वासाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महिला बचत बचत गटाच्या सदस्यांनी मनोगतात स्नेहलता कोल्हे यांनी महिला सक्षमीकरण व महिलांच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव मतदारसंघातील गोरगरिबांचे विविध प्रश्न सोडवून त्यांच्या दारापर्यंत विकासाची गंगा पोहोचवली. त्यांनी ग्रामीण भागात बांधावर जाऊन महिलांना आर्थिक बचतीचे महत्त्व पटवून दिले. महिलांना संघटित करून बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवले. त्यांनी पावणेतीन हजाराहून अधिक महिला बचत स्थापन केले. महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवले. त्यांच्यामुळे आज असंख्य महिलांचे जीवनमान सुधारले असून, त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. निरांजनातील ज्योतीप्रमाणे स्वत: अखंड तेवत राहून त्यांनी अनेकांचे जीवन प्रकाशमान केले. महिलांना मान-सन्मान मिळवून दिला, अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या.