शेवगाव प्रतिनिधी, दि. ०८ : शेतीवर बदलत्या हवामानाचा परिणाम होऊन पीकाच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते. पिकाचे उत्पादन वाढीसाठी मधमाशा परागीकरण प्रक्रियेत महत्त्वाचे कार्य करत असतात. म्हणून ग्रामीण तरुणांनी मधुमक्षिका पालन हा कृषीला किफायतशीर असलेला जोड व्यवसाय अवश्य करावा. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन तर होईलच शिवाय त्यापासून आपले उत्पादन देखील वाढणार असल्याने हा व्यवसाय करावा असा सल्ला दहिगावनेच्या कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण विषय तज्ञ माणिक लाखे यांनी दिला आहे.
तालुक्यातील दहिगावने येथील घुले शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शनिवार दि. ७ ऑक्टोबर २०२३ अखेर पाच दिवसीय ” मधुमक्षिका पालन प्रशिक्षण ” शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराच्या समारोप प्रसंगी लाखे बोलत होते. या प्रशिक्षणात ठिकठीकाणच्या ग्रामीण तरुणांनी सहभाग घेतला. सदर प्रशिक्षणामध्ये शिबीरार्थींना महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. संदीप लांडगे कृषी विज्ञान केद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. इयाम सुंदर कौशिक, केंद्रातील विषय विशेषज्ञ सचिन बडदे, नंदकिशोर दहातोंडे, राहुल कावळे, नारायण निवे, डॉ.गवळी, प्रकाश हिंगे, प्रकाश बहिरट यांनी मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणार्थी सर्व तरुणांना मधुमक्षिका पालन व्यवसायाची ओळख व्हावी या दृष्टीने श्रीरामपूर येथील ऋषिकेश औताडे यांच्या मधुमक्षिका पालन केंद्रास भेट देऊन प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नरेंद्र घुले, संचालक माजी आ. चंद्रशेखर घुले, सचिव अनिल शेवाळे, सहसचिव रवींद्र मोटे यांनी या प्रशिक्षण आयोजनासाठी मार्गदर्शन केले. केंद्राचे कर्मचारी देशमुख अनिल, देशमुख प्रवीण, दत्तात्रय वंजारी, अनिल धनवटे, राम लांडगे, अंकुश क्षीरसागर यांनी शिबीराच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.