नुकसान बघायला आलेल्या आमदारांनी दाखवले खोटे पक्ष प्रवेश – गोरख पवार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : गावातीलच शेजारील सहकाऱ्याचे अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते ते बघण्यासाठी गेलेल्या गोरख पवार यांना कुठलीही कल्पना न देता गळ्यात मफलर टाकून फसवा पक्षप्रवेश करून घेणारे व जनतेची काळजी नसताना खोटे पक्षप्रवेश करणारे आमदार आशुतोष काळे यांचे बिंग फुटले आहे. गोरख पवार यांच्या वतीने खुलासा समोर आला असून मी प्रवेश करण्यासाठी गेलो नव्हतो तर शेतीचे नुकसान बघण्यासाठी गेलो होतो असे स्पष्ट केले आहे. असे खोटे पक्षप्रवेश करण्यात धन्यता मानणाऱ्या काळे यांचे फसवेगिरीचे या घटनेने पितळ उघडे पडले आहे.

शेतकरी अतिवृष्टीत दुःखी असताना, असंवेंदशिल आमदार मात्र खोटे पक्षप्रवेश करण्यात धन्यता मानत होते. हे आमचे नुकसान बघायला आले होते की, असे खोटे प्रवेश दाखवून शेती नुकसान झाले त्या जमखेवर मीठ रगडायला आले होते असा प्रश्न आम्हाला पडतो आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

नागरीकांना कल्पना न देता, त्यांचे काही काम अडलेले असेल आणि आमदार या नात्याने समस्या नागरिकांनी मांडली तर तुमचे काम करू पण आधी प्रवेश करा अशा अटी घालून कुणावर आलेल्या वाईट वेळेचा देखील गैरफायदा घेण्यासाठी हे कमी करत नाहीत. त्यांचे पूर्व भागातील शेजारील गावातील काही हस्तक वापरून हे प्रताप केले गेले आहे. पाच वर्षात ठोस काम नाही, रस्ते फुटले आहे, पाटपाण्याचा बोजवारा उडाला आहे, बेरोजगारी तालुक्यात भीषण वाढली आहे, कायदा सुव्यवस्था राखण्यात आमदार अपयशी झाले आहे, कोट्यवधीचा निधीच्या खोट्या वल्गना झाल्या आहेत त्यामुळे हे सर्व अपयश झाकण्यासाठी असे खोटे प्रवेश करून वेळ काढून नेण्याचा प्रकार सुरू आहे.

प्रत्येक गोष्टीत राजकारण पाहून हजारो कोटींच्या विकासाच्या खोट्या वल्गना करणाऱ्या काळे यांना तोंडघशी पाडत आम्ही कोल्हे गटाचे होतो, आहोत आणि पुढे राहू असा व्हिडीओ पवार यांनी प्रसिद्ध केला आहे. यावेळी ज्ञानेश्वर पवार, उपसरपंच किशोर पवार, सोना पवार, सुरेश निकम, सोमनाथ निकम, दत्तू मोरे, अरुण माळी, योगेश निकम, निवृत्ती पवार, रवींद्र पवार, जालू पवार, रमेश निकम, लक्ष्मण निकम हे उपस्थित होते.

एकीकडे शेतकरी उभी पीक पाण्यात बुडाली असताना संकटात होता त्यावेळी आमदार मात्र खोटे पक्षप्रवेश करून घेत आनंद लुटत होते. हे चित्र उघड पडल्याने काळे यांना दोन दिवसात दुसरा धक्का मानला जातो आहे.

Leave a Reply