कापूस खरेदीत व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची लुट – दत्ता फुंदे 

शेवगाव प्रतिनिधी, दि. ४ : सध्या शेवगाव शहरासह तालुक्यात गावोगाव कापसाची खेडा खरेदी चालू आहे. ते रस्त्यावरील व्यावसायिक जास्तीत जास्त ६ हजार रुपये किंटल पर्यंत भाव देतात. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी लुट होत असल्याने ती रोखण्यासाठी तालुक्यात हमी भाव खरेदी केंद्र लगेच सुरु करण्यात यावीत व त्यापेक्षा कमी भावाने कापूस खरेदी करणारावर रीतसर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा त्यासाठी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

जिल्हयाचे पालकमंत्री विखेपाटील यांना फुंदे यांनी पाठविलेल्या निवेदनात  म्हटले आहे की, सध्या दिवाळी दसऱ्या सारखे सण तोंडावर आल्याने  शेतकरी मंडळी हे सण साजरे करण्यासाठी घरातील शेतीमाल येईल त्या भावात विकण्याच्या मनःस्थितीत असतात  व्यावसायिक नेमक्या याच परिस्थितीचा फायदा उठवत आहेत. कापसाचा हमी भाव ७ हजार ५२१ रुपये क्विंटल असा शासनाने जाहीर केला आहे. मात्र खासगी व्यावसायिक शेतकऱ्यांना अवघा ६ हजार रुपये  क्विटल तर अनेकदा  कापसाला नांवे  ठेवत शेदोनशे कमी देऊन शेतकऱ्यांची बोळवण केली जाते. 

वास्तविक  महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन ( विकास व विनियमन ) आधिनियम १९६३ व नियम १९६७ मधील नियम ९४ ड (३) मधील तरतुदीनुसार हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी करून शेतकऱ्यांची पिळवणुक करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करावी असा दंडक असतांना येथे बाजार समितीचे वा शासनाचे ही लक्ष नाही. सणासुदीच्या दिवसात येथील अडलेल्या शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक दृष्टी आड करून चालणार नाही.

शेवगाव तालुका कापसाचे आगार असून तालुक्यात ४५ हजार हेक्टरवर कपासीची लागवड झाली आहे. येथील कापूस लांब धाग्याला असून त्याला राज्या बाहेरूनही मोठ्या प्रमाणात मागणी असते. म्हणून पणन महामंडळाने येथे कायमस्वरूपी हमी भाव खरेदी केंद्र चालू ठेवायला हवे अशी स्थिती असतांना  दरवर्षी ते सुरु करण्यासाठी मागणी केल्याशिवाय ते सुरु करायचे नाही असा शासनाने जणू  अलिखित नियमच  केला की काय? असा प्रश्न करून हे खरेदी केंद्र  आंदोलन करण्याची पाळी न येता त्वरित सुरु  करावे. अशी मागणी करण्यात आली आहे. 

Leave a Reply