कोपरगांव प्रतिनिधी, दि. ४ : गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त यंत्रसामुग्रीद्वारे मुरघास गाठी तयार करण्याचा शुभारंभ राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख पूज्य रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते ब्राम्हणगांव येथे शेतावर नुकताच करण्यात आला. नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वाजवी दरात आणि कमी वेळेत मुरघास तयार करुन मिळणार असल्याने शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त केले जात आहे.
फरिदाबाद (पंजाब) येथील धालिवाल ॲग्रो या कंपनीने अत्याधुनिक तंत्र वापरुन तयार केलेले मुरघास निर्मिती मशीन गोदावरी खोरे दूध संघाने नुकतेच खरेदी केले असून शेतकऱ्यांना ना नफा ना तोटा या तत्वावर मुरघास गाठी तयार करण्यासाठी ते उपलब्ध करुन दिलेले आहे. या मशिनरीचे उद्घाटन शुक्रवारी ( दि. ४ ) प. पूज्य रमेशगिरीजी महाराज, गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील, धालिवाल ॲग्रोचे प्रमुख रवींद्रसिंग धालिवाल यांच्या हस्ते ब्राम्हणगांव येथील शेतकरी शांताराम जगधने यांच्या शेतावर विधीवत पूजा करुन करण्यात आले.
या प्रकल्पाविषयी माहिती देताना परजणे यांनी सांगितले की, आधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेले हे मशीन अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम गोदावरी दूध संघाने खरेदी केलेले आहे. मका पिकासह ज्वारी पिकाच्याही मुरघास गाठी या मशिनरीद्वारे तयार करता येणार आहेत. ताशी पाच ते साडेपाच टन मुरघास तयार करण्याची क्षमता या मशिनमध्ये आहे. मागणीनुसार शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन या मशीनद्वारे मुरघासाच्या गाठी तयार करुन देता येतील. याशिवाय संघाने संघानजीक मनाईवस्ती परिसरात मुरघास प्रकल्प सुरु केलेला असून तोही लवकरच कार्यान्वित होणार आहे. त्याठिकाणी देखील मका व ज्वारीचा ओला चारा घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना मुरघासाच्या गाठी तयार करुन दिल्या जाणार आहेत. कमी खर्चात आणि अत्यंत कमी वेळेत मका व ज्वारीच्या चाऱ्यांपासून मुरघास गाठी तयार करुन दिल्या जाणार असल्याने संघाच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांनाही या प्रकल्पाचा लाभ होणार असल्याने शेतकऱ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
या उद्घाटन कार्यक्रमास संघाचे संचालक नानासाहेब काळवाघे, जगदीप रोहमारे, संजय टुपके, भिकाजी झिंजुर्डे, पंचायत समितीचे सदस्य श्रावण आसने, सरपंच अनुराग येवले, उपसरपंच ज्ञानदेव जगधने, सोमनाथ जगधने, दादा आसने, सोपान चांदर, संभाजी रोहोम, शिवाजी रोहोम, साईराज दूध संस्थेचे चेअरमन सचिन आसने, नंदकुमार बंड, संजय जगताप, बाबासाहेब जगताप, चंद्रशेखर जगताप, तुकाराम मुळेकर, वसंत आसने, श्रावण आहेर, वसंत बनकर, बाळासाहेब बनकर, पोलीस पाटील रवींद्र बनकर, योगेश सांगळे, किसन गाजरे, गोकूळ येवले, निलेश सांगळे, भाऊराव आहेर, अमोल जगधने, महेश जगधने, वाल्मिक जगधने, विशाल जाधव यांच्यासह संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे, खातेप्रमुख प्रकाश रासकर, संतोष मेहेत्रे, बबन रोहोम, संजय वायखिंडे यांच्यासह ग्रामस्थ, शेतकरी व संघाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमनाथ जगधने यांनी आभार व्यक्त केले.