स्व.कोल्हेंचे योगदान संपूर्ण  समाजाला विसरता येणार नाही – राजेंद्र बागुल 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुर्णाकृती पुतळा लोकार्पण कार्यक्रमावरून मतभेद 

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा राज्यासह देशात व जगात सर्वप्रथम माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव येथे बसवला आणि तिथुनच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची अधिक ओळख समाजाला झाली त्यामुळे स्व. शंकरराव कोल्हे यांचे योगदान समाजाला विसरता येणार नाही. लोकार्पण सोहळ्यामध्ये कोल्हे परिवाराला मानाचे स्थान दिले पाहीजे अशी भुमिका समाज बांधवाच्या वतीने राजेंद्र बागुल यांनी व्यक्त करीत लोकशाही अण्णाभाऊ साठे पुर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळाबाबत चर्चा केली.

शुक्रवारी कोपरगाव नगरपालीकेचे मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या दालनात सकाळी ११ वाजता मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी व समाजातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची  बैठक झाली. ७ ऑक्टोबर रोजी शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा साठे यांचे नातू सचिन साठे यांच्या हस्ते, आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पालकमंञी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.

 समाजातील अनेकांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पत्नी सिंधुताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुतळ्याचा लोकार्पण सोहळा करावा अशी मागणी केल्याने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यावरुन पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. अण्णाभाऊ साठे यांचा ज्यांनी देशात पहीला पुतळा बसवला ते स्व. शंकरराव कोल्हे सध्या हयात नसले तरी त्यांच्या पत्नी सिंधुताई कोल्हे यांच्या उपस्थित सन्मानाने लोकार्पण सोहळा करावा अन्यथा हा सोहळा होवू देणार नाही. जर केलाच तर आम्ही निषेध करुन काळे झेंडे दाखवणार असा इशारा यावेळी अनेक समाज बांधवांनी दिल्याने दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या सोहळ्याला पुन्हा वादाची किनार लागली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून पुतळ्याचा लोकार्पण सोहळा झाला नाही. समाजातील अनेकांनी विविध प्रकारे आंदोलने केली उपोषणे  केली. अखेर पालीका  प्रशासनाने लोकार्पण सोहळा निश्चित करुन तारीख जाहीर केल्यानंतर समाजातील कार्यकर्त्यांमध्ये मतमतांतरे सुरु झाली. अंतर्गत वादविवाद व मतभेद मिटवण्यासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक देखरेख समितीचे अध्यक्ष सुखदेव जाधव, उपाध्यक्ष विनोद राक्षे, राजेंद्र बागुल, नितीन साबळे, शरद ञिभुवण, नितीन पोळ, फकिरा चंदनशिवे यांच्यासह अनेक समाजबांधव एकञ येवून चर्चा केली.

पुतळा आणण्यासाठी खडतर गेलेला भुतकाळ, सध्याच्या राजकीय कोरघोडी व भविष्याचा वेध घेवून एकमेकांमधील उनेधुने काढून लोकार्पण सोहळा कसा असावा यावर चर्चा करण्यात आली. काही कार्यकर्त्यांनी राजकीय बाजू घेतली तर काहींनी सामाजीक बांधीलकी जपली तर काहींनी थेट चर्चेतून बाहेर जाणे पसंत केले. आडीज तासाच्या चर्चेअंती काहीसं एकमत करुन ७ ऑक्टोबरच्या सोहळ्याची तयारी दर्शवली. काही कार्यकर्त्यांनी या लोकार्पण सोहळा कडाडून विरोध करीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा सोहळा हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत करावा.

छोटेखानी कार्यक्रमात घेवून जागतीक कीर्तीचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची उंची कमी करु नये. संपूर्ण  राज्यातील समाजबांधव कार्यक्रमाला येण्यासाठी व त्यांच्यापर्यंत निरोप पोहचवण्यासाठी  दोन दिवसांचा कालावधी फार कमी आहे तेव्हा हा सोहळा पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी केली. जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणले नाही तर आपण पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला. 

 यावेळी विनोद राक्षे यांनी समाज बांधव व प्रशासन यांच्यामध्ये समेट घडवण्यासाठी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पत्नी सिंधुताई कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोहळा करण्याची मागणी करुन निमंञण पञिकेत बदल करण्याची विनंती केली. प्रशासक व मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी सांगितले की, हा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली असल्याने त्यांनी घेतलेल्या निर्णयात व छापलेल्या पञिकेत बदल करण्यासाठी अडचण येवू शकते माञ मी स्वतः सिंधुताई कोल्हे यांना सन्मानपूर्वक निमंञण देवून कार्यक्रमामध्ये आदराने मानसन्मान देवु असे सांगितल्याने समाजबांधवांनी एकमुखी सहमती  दिली.  दरम्यान माजी नगराध्यक्ष यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल उपस्थित सर्व समाज बांधवांनी वहाडणे यांचा निषेध व्यक्त केला.

 …चौकट…

 स्व. शंकरराव कोल्हे यांनी  राजकीय जीवनात असताना गोरगरीब दलितांच्या चुली पेटवल्या. कोणाच्या चुलीत पाणी ओतले नाही. समाजाला कड्या खांद्यावर  घेवून फिरणारे  स्व. कोल्हे आम्हाला पांडुरंगासमान वाटतात. त्यांनी राजकारण केले, पण समाजाला दुबळं करुन बाजुला ठेवले नाही. – राजेंद्र बागुल.

Leave a Reply