शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : येथील शेवगाव -गेवराई मार्गावरील एका हॉटेलमध्ये कुंटणखाना चालविला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने काल शनिवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या व स्थानिक पोलिसाच्या संयुक्त पथकाने छापा टाकून कुंटणखाना चालविणाऱ्या एकास ताब्यात घेऊन व दोन माहिलांची
सुटका केली आहे.
स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई तुषार धाकराव पोलीस अंमलदार संदीप दरंदले, संतोष खैरे, विशाल तनपुरे, ज्योती शिंदे तसेच रणजीत जाधव यांचे पथकास या साठी कारवाई बाबत सुचना देवुन रवाना केले होते. या पथकाने शेवगावचे पोनि समाधान नागरे यांचेसी संपर्क साधून स्थानिक पोलीस अंमलदार प्रियंका शिरसाठ, किशोर पालवे यांना समवेत घेऊन गेवराई मार्गावरील हॉटेल राजयोगवर छापा टाकून कारवाई केली.
प्रारंभी पथकाने हॉटेल राजयोगमध्ये चालणाऱ्या कुंटणखान्यावर खात्री करण्याकरीता पथकातील पोलीस अंमलदार बनावट ग्राहक म्हणुन पाठविले. हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय चालू असल्याची खात्री पटल्यानंतर शासकीय पंचा समक्ष हॉटेलवर छापा टाकुन हॉटेलमधील अमर मारूती ढाकणे, वय २४ रा.हसनापूर, ता.शेवगाव यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातुन २० हजार रूपये किंमतीचा एक मोबाईल व एक हजार रूपये रोख रक्कम असा एकुण २१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
अमर मारूती ढाकणे याचेसह हॉटेलची पाहणी करता हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील रूममध्ये दोन महिला मिळून आल्या. महिलाकडे विचारपुस केली असता त्यांचेकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे समजल्या वरून पथकाने महिलांची सुटका केली.
या कारवाईत अमर मारूती ढाकणे, वय २४ रा.हसनापूर, ता.शेवगाव, व हॉटेल मालक बाबासाहेब अंधारे (पुर्ण नाव माहित नाही), रा.शेवगाव, हे स्वत:चे आर्थिक फायदयाकरीता दोन महिलांकडून कुंटणखाना चालवून त्यावर आपली उपजिवीका करताना मिळून आले आहेत. त्यांचेविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या मपोकॉ ज्योती शिवाजी शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ७, ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.