रितसर फटाके विक्रेत्यांना बंधन, चोरून विकणाऱ्याना सवलत

कोपरगावच्या प्रशासनाचा अजब कारभार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १ : शहरात दरवर्षी शासकीय नियमाने कायद्याचे पालन करुन रितसर शासकीय फि भरणाऱ्या फटाके व्यापाऱ्यांना अनेक बंधने लावून शहरातील बाजारपेठेत न बसु देता थेट एका कोपऱ्यात दुर्गंधी असलेल्या ठिकाणी दुकाने लावण्याची परवानगी दिली. तिथे कोणतीही सुविधा नाही त्यांच्यावर स्थानिक प्रशासनाची करडी नजर आणि बेकायदा फटाके विकणाऱ्यांना मुकसहमती देत धोकादायक फटाके विक्री करण्याची परवानगी दिल्याचे चिञ कोपरगाव शहरात सुरु आहे.

शहरातील येवला रोड येथील माऊली मिसळ येथे तर थेट हाॅटेलच्या समोर फटाक्यांची विक्री सुरु आहे. अतिशय स्फोटक असलेले फटाके अग्नि पासुन दूर असण्याऐवजी हाॅटेल सारख्या ठिकाणी विक्री करुन स्वता:सह इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यावर प्रशासनाने कारवाई करण्याऐवजी केवळ काही फटाके ताब्यात घेतले. परंतू संबंधीत फटाके विक्रेता पुन्हा राञी उशिरा पर्यंत फटाक्यांची विक्री करीत होता.

दरम्यान निवारा येथील एक फटाका विक्रेता तर थेट राहत्या घरातुन फटाक्यांची विक्री करुन प्रशासनाच्या डोळ्यात फुलबाजा घातला असल्याने प्रशासनाच्या डोळ्याला हा घातकी प्रकार दिसला नाही. शहरातील साई सिटी येथे तर एका महाभागाने चारचाकी गाडीमध्ये फटाक्यांची विक्री करुन प्रशासनाच्या नियमाची सुरसुरी केली आहे. शहरात पालीका प्रशासनाकडे रितसर पैसे भरुन एकाच ठिकाणी सुरक्षित फटाके विक्री करणारे ३९ फटाके स्टाॅलधाकांनी पालीकेला खुल्या जागेचे ३ लाख २१ हजार रुपये भरले. पालीकेने त्या बदल्यात त्यांना साधे पञ्याचे शेड मारून दिले नाही लाईटची व इतर सुविधा दिल्या नाहीत.

दरवर्षी शहरातील मध्यभागी तहसिल मैदानावर दुकाने थाटवण्याची परवानगी दिली जात होती. माञ यावेळी विधानसभा निवडणुकीचे कारण देत कायदेशिर फटाके विक्रेत्यांना थेट स्मशान भूमी जवळील दुर्गंधीयुक्त मैदानावर विक्रीची परवानगी दिल्याने शहरातील ग्राहकांनी दुर्गंधीमुळे व बाजारपेठेपासुन दूर असल्याने तिकडे जाण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशातच बेकायदा फटाके विक्रेत्यांनी या संधीचा गैरफायद घेवून स्फोटक फटाके असुरक्षितणे कुठेही दुकाने थाटवून फटाक्यांची विक्री सुरु केली आहे.

पोलीस प्रशासन व नगरपालीका प्रशासनाने बेकायदा फटाके विक्रेत्यांना मुकसहमती दिल्याने कायदेशिर फटाके विक्रेत्यांना त्याचा थेट फटका बसत आहे. लाखो रुपये गुंतवणूक करुन कायदेशिर फटाके विक्रेत्यांची फटाके विक्री होत नाही त्याचा त्यांना अर्थीक भुर्दंड बसला आहे. दिवाळीच्या ऐन दिवशी फटाके विक्रेते ग्राहकाविना बसले होते. अनेक फटाका विक्रेत्यांनी स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करुन बेकायदा फटाके विक्रेत्याबद्दल रोष व्यक्त केला. अचानक फटाक्यांचा स्फोट होवुन जर काही झाले तर याला स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचे मत फटाके विक्रेत्यांनी व्यक्त केले. ग्राहकांनी पाठ फिरवली तर प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने कायदेशिर फटाके विकाणारे अडचणीत आले तर बेकायदा फटाके विकणारे मालामाल झाले आहेत.

Leave a Reply