ग्रामीण भागातून शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातून अनेक विद्यार्थी शाळा व महाविद्यालयीन शिक्षणासाठी दररोज एस. टी. बसने कोपरगाव शहरात येतात. पुरेशा प्रमाणात एस. टी. बससेवा उपलब्ध नसल्याने, या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी दखल घेऊन कोपरगाव आगारामार्फत नियमित व वेळेवर एस. टी. बसेस सोडून विद्यार्थ्यांच्या अडचणी त्वरित सोडवाव्यात, अशा सूचना कोपरगावचे आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांना दिल्या.

कोपरगाव शहरात रयत शिक्षण संस्थेचे के. बी. पी. विद्यालय व इतर शाळा, एस. एस. जी. एम. महाविद्यालय तसेच के. जे. सोमैय्या महाविद्यालय, संजीवनी शिक्षण संस्थेचे अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन, एम. बी. ए. महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय आणि इतर विविध नामांकित शैक्षणिक संस्था आहेत.

तालुक्याच्या ग्रामीण भागातून अनेक मुले-मुली शिक्षणासाठी दररोज एस. टी. बसने कोपरगाव शहरात येतात. या विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयात वेळेवर पोहोचावे लागते. मात्र, विद्यार्थ्यांना दररोज सकाळी कोपरगावला येण्यासाठी आणि संध्याकाळी परत गावी जाण्यासाठी वेळेवर एस. टी. बस मिळत नाही. पावसाळ्यात तर त्यांचे खूप हाल होतात. एस. टी. बसेस वेळेवर सुटत नाहीत.

वेळेवर बस मिळत नसल्याने, त्यांच्या तासिका बुडतात व शैक्षणिक नुकसान होते. गर्दीमुळे बसमध्ये बसायला जागाही उपलब्ध नसते. विद्यार्थ्यांच्या एस. टी. बस प्रवासासंदर्भातील समस्या सोडविण्याबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच विद्यार्थ्यांची मागणी व संख्या लक्षात घेऊन जास्त बसेस सोडण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना युवा नेते विवेक कोल्हे यांनी आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांना दिल्या आहेत. 

दरम्यान, कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील खोपडी, धोत्रे, भोजडे व परिसरातील विद्यार्थ्यांना कोपरगावला ये-जा करण्यासाठी नियमित व वेळेवर एस. टी. बससेवा उपलब्ध नसल्यामुळे, त्यांचे अतोनात हाल होत आहेत. वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने, गुरुवारी (१० ऑगस्ट) खोपडी, धोत्रे, भोजडे व परिसरातील विद्यार्थ्यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांना भेटून आपली कैफियत त्यांच्यासमोर मांडली.

विवेक कोल्हे यांनी आगार व्यवस्थापक अमोल बनकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून कोपरगाव आगाराच्या वतीने विद्यार्थी व प्रवाशांच्या मागणीप्रमाणे नियमित व वेळेवर पुरेशा प्रमाणात एस. टी. बससेवा उपलब्ध करून देण्याची सूचना केली. तसेच विद्यार्थ्यांच्या अडचणी व विविध मागण्यांबाबत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आगार व्यवस्थापक बनकर यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक स्वराज सूर्यवंशी, शैलेश नागरे, सुदर्शन थोरे, कृष्णा जगताप, (खोपडी), विश्वजित चव्हाण (धोत्रे), पवन सिनगर, आलिम शेख (भोजडे), सौरभ रोकडे, शुभांगी मनचरे, पूजा जेऊघाले आदी विद्यार्थी व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक उपस्थित होते.

दररोज सकाळी ९ वाजता कोपरगावला येणारी एस. टी. बस धोत्रे या गावातच फुल भरून जाते. ही बस भोजडे येथे थांबत नाही. वेळेवर दुसरी बसदेखील उपलब्ध नसते. सकाळी ११ ची बसही वेळेवर येत नाही. आली तर ही बस खोपडी गावात जात नाही. कोपरगावहून खोपडी, धोत्रे, भोजडे भागात जाण्यासाठी रोज संध्याकाळी ५.३० वाजता एस. टी. बस आहे; पण ही बस कोपरगाव बसस्थानकावर निर्धारित वेळेत प्लॅटफॉर्मवर लागत नाही. ही बस स्थानकावरच गच्च भरते. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये जागा मिळत नाही. तसेच ही बस व इतर बसेस सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यासमोर असलेल्या अधिकृत थांब्यावर थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.

यापूर्वी भोजडे येथे जाण्यासाठी एस. टी. बस सुरू होती; परंतु ती बस मध्येच बंद करण्यात आली. यापूर्वी एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही अद्याप ही बस सुरू झालेली नाही. विद्यार्थ्यांच्या या सर्व अडचणी लक्षात घेऊन कोपरगाव आगारामार्फत दररोज पुरेशा प्रमाणात वेळेवर एस. टी. बसेस सोडण्यात याव्यात व विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे.