डाॅ. साक्षी शेटे यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे, कारवाडी येथून प्रसुतीस आलेल्या रेणुका किरण गांगुर्डे या आदिवासी महिलेवर वेळेत उपचार न झाल्याने, अती रक्त स्त्रावामुळे या महिलेचा उपचाराअभावी मृत्यु झाल्याने, आरोग्य विभागात खळबळ उडाली.
गर्भवती महीलेला वेळेत उपचार न देणारे तसेच कामात निष्काळजीपणा करून एका गरीब महीलेचा बळी घेणारे चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. साहिल त्रिंबक खोत यांचे निलंबन करण्यात आले, तर तिथे ठेकेदारी पध्दतीने रुग्णवाहिका चालवणारा चालक संजय एकनाथ शिंदे याला कार्य मुक्त करण्यात आले. तसेच तिथे वैद्यकीय सेवा देणाऱ्या डाॅ. साक्षी शेटे यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास घोलप यांनी दिली.
दरम्यान ३ ऑगस्टच्या पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान रेणुका किरण गांगुर्डे या आदिवासी महीलेला प्रसुतिच्या वेदना सुरु झाल्या असता जवळच्या चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेवून गेले. तिथे एकही डॉक्टर सेवेला हजर नव्हते तसेच रुग्णवाहिका चालकाने रुग्णवाहिकेत इंधन संपल्याचे कारण पुढे केल्याने संबंधीत महिलेला जवळच्या दुसऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा रस्ता दाखवून तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी माणुसकीला काळीमा फासला. संबंधीत महीलेला प्रसुतीदरम्यान उपचारात दिरंगाई झाल्याने अति रक्तस्राव होवून गरोदर महीलेने बाळाला जन्म देवून जगाचा निरोप घेतला.
केवळ डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे या महीलेचा मृत्यू झाला. या घटनेची दखल जिल्हा परिषद अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी घेतली आणि अखेर डॉ. साहिल खोत यांचे निलंबन केले व रुग्णवाहीकेवरील चालकाला कार्य मुक्त करुन घरी पाठवले तसेच डॉ. साक्षी शेटे यांच्यावरही कारवाई सुरु आहे.
दरम्यान या घटनेने नागरीकांमध्ये चिड निर्माण झाली असुन, गरोदर महिलेच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या सर्वांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
या पुर्वीही चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे तेथील एका महिलेची प्रसुती उघड्यावर चक्क गेटसमोर झाली होती. तालुक्याच्या टोकाचे गाव असल्याने या आरोग्य केंद्रावर गरीब शेतमजूर उपचारासाठी जात असतात. माञ वैद्यकीय यंञणेत काम करणाऱ्यांची मुजोरी वाढत गेल्यामुळे नागरीकांचे आरोग्य व जीवन धोक्यात आहे. हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले.