एफआरपी प्रमाणे साखरेच्या एमएसपी वाढीबाबत निर्णय घ्यावा – आमदार काळे

काळे सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु

कोपरगाव प्रतिनिधी दि. ९ : ऊसाची एफआरपी वाढविली जाते हा निर्णय अतिशय स्वागतार्ह असून त्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होतो. परंतु ज्या वेळी ऊसाची एफआरपी वाढविली जाते त्यावेळी एमएसपी अर्थात साखरेची विक्री किंमत देखील वाढविली पाहिजे. मागील ५ वर्षाची आकडेवारी पहाता हंगाम २०२०-२१ मध्ये साखरेची एमएसपी रु.३१००/- प्रति क्विंटल तर ऊसाची एफआरपी ही रु.२८५०/- प्र.मे.टन होती. तर चालू गाळप हंगामात एफआरपी रु.३४००/- प्र.मे.टन झाली आहे तर साखरेची विक्री किंमत अर्थात एमएसपी रु.३१००/- प्रति क्विंटल एवढीच आहे जी तीन वर्षापूर्वी होती.

मागील पाच वर्षातील साखरेच्या किमान विक्री दरात कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही. परंतु ऊसाच्या एफआरपी मध्ये मात्र रु.५५०/- प्र.मे.टन इतकी वाढ झालेली आहे. एफआरपी वाढली पाहिजे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला पाहिजे यात दुमत नाही. परंतु ज्या वेळी एफआरपी मध्ये वाढ केली जाते त्यावेळी ती एफआरपी साखरेच्या दराशी निगडीत असावी. साखरेची विक्री किंमत अर्थात एमएसपी वाढवावी याबाबत साखर संघ, ईस्मा (ISMA) यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला परंतु त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नसून केंद्रीय अन्न मंत्रालयाने त्यावर तातडीने  निर्णय घ्यावा व साखर उद्योगाला दिलासा द्यावा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी केली आहे. 

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४/२५ या वर्षाच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व चेअरमन आ.आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैतालीताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून संचालक मंडळाच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला याप्रसंगी आ.आशुतोष काळे बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मागील वर्षी राज्यात ११० लाख टन साखर उत्पादन झाले होते परंतु चालू वर्षी राज्यामध्ये सुमारे १० लाख टन साखर उत्पादन घटेल असा अंदाज असून यावर्षी ९० ते १०२ लाख टन साखर उत्पादन होवू शकते. आपल्या कारखान्याने जवळपास साडे सहा लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट्य ठेवले आहे. चालू वर्षी ऊस वाढ चांगली झाली आहे. गळीत हंगामाच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्या असून मंत्री समितीच्या निर्णयानुसार १५ नोव्हेंबर नंतर सर्वच कारखाने सुरु होणार असले तरी गाळप हंगाम ऊस तोडणी कामगारांवर अवलंबून असल्यामुळे व राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लक्षात घेता कारखाने निवडणूक झाल्यावरच सुरु होतील.

केंद्र शासनाने १९८७ च्या ज्यूट पॅकिंग कायद्याच्या आधारे साखरेचे पॅकिंग हे ज्यूट बॅगमध्ये करण्याचा आग्रह करीत आहे. परंतु साखरेचे पॅकींग ज्यूट बॅगमध्ये साखरेचे पॅकिंग करणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे साखरेचे पॅकिंग कारखान्यांना स्वायत्ता द्यावी अशी मागणी देखील आ.आशुतोष काळे यांनी केद्र शासनाकडे केली आहे. ऊस उत्पादक शेतकरी यांचे सदैव हित जोपासणाऱ्या कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या आदर्श विचारांवर व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा हंगाम यशस्वी करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले.

 याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, तसेच कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे,महानंदाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते कारभारी आगवण, नारायणराव मांजरे, पद्माकांत कुदळे, संभाजीराव काळे, संचालक सुधाकर रोहोम, सूर्यभान कोळपे, राजेंद्र घुमरे, दिलीपराव बोरनारे, सचिन चांदगुडे, डॉ. मच्छिंद्र बर्डे, राहुल रोहमारे, वसंतराव आभाळे, श्रीराम राजेभोसले, अनिल कदम,दिनार कुदळे, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप,प्रवीण शिंदे, सौ. इंदूबाई शिंदे, सौ. वत्सलाबाई जाधव, गंगाधर औताडे, श्रावण आसने,

गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, गौतम केनचे कार्यकारी संचालक सुभाष गवळी, कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चिफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे, शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे, उद्योग समुहातील सर्व संलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक पदाधिकाऱ्यांसह सभासद, शेतकरी, कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्र.कार्यकारी संचालक सुनील कोळे यांनी केले. सूत्रसंचालन माजी संचालक अरुण चंद्रे यांनी केले तर उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.