शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव, शिव-पार्वती विवाह सोहळा साजरा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : जगातील एकमेव असलेल्या कोपरगाव येथील बेट भागातील दैत्यगुरू श्री शुक्राचार्य मंदिरामध्ये गुरुवारी (२४ ऑगस्ट) सकाळी सद्गुरू शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली.

राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज, विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे प. पू. जंगलीदास गुरुमाऊली, प. पू. शारदागिरी महाराज, प. पू. उंडे महाराज व अन्य संत, महंतांसह असंख्य भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी सहभागी होऊन सद्गुरू श्री शुक्राचार्य महाराजांचे व पालखीचे मनोभावे दर्शन घेतले.

‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीकाठी वसलेल्या कोपरगाव शहराजवळील बेट भागात दैत्यांचे गुरू व संजीवनी मंत्राचे निर्माते श्री शुक्राचार्य महाराज यांचे मंदिर आहे. हे जगातील एकमेव मंदिर असून, प्रतित्र्यंबकेश्वर म्हणून या देवस्थानची ख्याती आहे. या परिसराला मोठा धार्मिक वारसा लाभलेला आहे.

सदगुरू शुक्राचार्य मंदिरात कोणतेही शुभ कार्य किंवा विवाह करण्यास कोणताही मुहूर्त, वेळ व नक्षत्र लागत नाही. बाराही महिने या मंदिरात शुभ कार्य व विवाह सोहळे संपन्न होतात. त्यामुळे येथे भाविकांची नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सद्गुरू शुक्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव, शिव-पार्वती विवाह सोहळा व पालखी मिरवणुकीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. त्याचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला.

यावेळी सद्गुरू शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी युवा नेते विवेक कोल्हे यांचा सत्कार केला. कोपरगाव शहर व परिसराला ऐतिहासिक, पौराणिक व धार्मिक वारसा लाभला असून, शहर व तालुक्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. या ठिकाणी दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

आज सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात आयोजित केलेल्या या धार्मिक सोहळ्यात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले. श्री सद्गुरू शुक्राचार्य महाराजांचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले, असे सांगून विवेक कोल्हे यांनी सद्गुरू शुक्राचार्य मंदिर ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.

याप्रसंगी अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, दादा नाईकवाडे, विजय रोहम, विलास आव्हाड, आप्पासाहेब शिंदे, भागचंद रुईकर, मंदिरप्रमुख सचिन परदेशी, कालूअप्पा आव्हाड, बाळासाहेब लकारे, विशाल आव्हाड, महेंद्र नाईकवाडे, दत्तात्रय सावंत, भीमा संवत्सरकर, प्रसाद पऱ्हे, बाळासाहेब गाडे, सचिन सावंत, मुन्ना आव्हाड, मधुकर साखरे, विभुते नाना, पटवर्धन आदींसह सद्गुरू शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.