संजीवनी सैनिकीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले चंद्रयान ३ मोहिमेचे प्रक्षेपण

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ : बुधवारी सायंकाळी भारतीय क्षितिजावर सुर्य मावळत असताना कोट्यावधी भारतीयांचे डोळे चंद्रावर खिळलेले होते. जगभरातील अब्जावधी लोकांना ज्याची प्रतिक्षा होती तो सुवर्णक्षण अवतरला. या सुवर्णक्षणाची संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे कॅडेट्सही मोठ्या उत्कंठेने वाट पहात होते.

चंद्रयान ३ च्या विक्रम लॅन्डरचे बुधवारी संध्याकाळी ६ वाजुन ४ मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉॅफ्टलॅडिंग झाले. या संपुर्ण घटनेचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांनी बुधवारी सायंकाळी ५.४५  ते ६.१० या वेळेत अनुभवले. गुरुवारी चंद्रयान ३ यशस्वी मोहिमेचा आनंदोत्सव स्कूलच्या प्रांगणात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

सदर आनंदोत्सव प्रसंगी डायरेक्टर (नॉनअकॅडमिक) ज्ञानेश्वर सांगळे, उपप्राचार्य कैलास दरेकर व शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आनंदोत्सवात सर्व प्रथम संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांच्या वतीने भारतीय अंतराळ संस्थेच्या (इस्त्रो) शास्त्रज्ञांचा अभिनंदनाच्या ठरावाचे वाचन दरेकर यांनी केले.

आनंदोत्सव प्रसंगी सांगळे यांनी सांगीतले की चंद्रयान ३ मोहिमेच्या माध्यमातुन दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. हे यश भारतीय अंतराळ संस्था इस्त्रो, चंद्रयान मोहिमेसाठी झटणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ तसेच त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या सरकारचे आणि वैज्ञानिक दृष्टीकोनावर विश्वास ठेवणाऱ्या कोट्यावधी भारतीयांचे आहे.

सदर प्रसंगी दरेकर यांनी चंद्रयान मोहिमे विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच कला शिक्षक अविनाश भोसले यांनीही चंद्रयानची प्रतिकृती तयार करून ही मोहिम कशी राबविण्यात आली, या विषयी सांगीतले. याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला. संतोष सुर्यवंशी यांनी सुत्रसंचालन करून आभार मानले.