‘दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लीग’ या संस्थेला ‘शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक’ जाहीर

शेवगाव प्रतिनिधी, दि.८ : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना दिला जाणारा २२२२/ २३ चा ‘शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक’ आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहातील ‘दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लीग’ या संस्थेला नुकतेच जाहीर झाला आहे. त्याबद्दल संस्थेच्या संचालक मंडळाने व कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

सामाजिक न्यायाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांना प्रेरणा मिळावी म्हणून मुख्यमंत्री तथा मंत्री सामाजिक न्याय यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीकडून पारितोषिकासाठी संस्थेची निवड केली जाते. रु. सात लाख पन्नास हजार, सन्मानपत्र, मानपत्रासाठी चांदीचा स्क्रोल, स्मृतीचिन्ह असे या पारितोषिकाचे स्वरूप असून ते दि.१२ मार्च २०२४ रोजी मुख्यमंत्री यांचे हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे.

दि फ्रेंड्स ऑफ दि डिप्रेस्ड लीग, शेवगाव ही संस्था सन १९३३ पासून शैक्षणिक व सामाजिक न्यायाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. या संस्थेची स्थापना कर्मयोगी आबासाहेब काकडे यांनी केली असून या ११ वस्तीगृह चालविले जात आहेत. जिल्ह्यातील एक प्रयोगशील व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून ओळख असणाऱ्या या संस्थेचे अॅड. डॉ. शिवाजी काकडे व जी. प. माजी सभापती हर्षदा काकडे हे नेतृत्व करीत आहेत. 

संस्थेच्या सर्व वसतिगृहाना संत गाडगे महाराज नाव असून गेल्या पाच- सहा दशकापासून त्यांच्या विचारावर ही संस्था मार्गक्रमण करीत आहे. संस्थेच्या वस्तीगृह विभागाचे प्रमुख रामेश्वर पालवे, रवींद्र कुटे व संजय भवर, सर्व अधीक्षक व कर्मचारी, संस्थेच्या विश्वस्त पृथ्वीसिंग काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण बिटाळ व त्यांचे इतर सहकारी समर्पण भावाने काम करीत आहेत.

त्याचेच फळ म्हणून हा पुरस्कार संस्थेला जाहीर झाले आहे. या पुरस्काराने आम्हाला काम करण्यास अधिक उर्जा मिळाली आहे. अशी प्रतिक्रिया ॲड. काकडे यांनी व्यक्त केली आहे.