शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : संपूर्ण देशाच्या भुकेचा प्रश्न सोडवणा-या बळीराजावर आत्महत्येची वेळ आली आहे. केंद्र सरकारमध्ये सत्तेत असतांना या प्रश्नाची कारणमिमांसा करुन शेतक-यांना आर्थिक अडचणीत लोटणा-या कर्जबाजारीपणावर उपाय म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंह व आपल्या सरकारने ७० हजार कोटींची ऐतिहासीक कर्जमाफी दिली. आज ही राज्यातील परिस्थिती भयावह आहे. सोयाबीन, कापूस , ऊस उत्पादक शेतक-यांना खर्चाच्या तुलनेत उत्पन्न पदरात पडत नाही. सरकारचे कृषी विषयक धोरण चुकीचेआहे. त्यामुळे शेतक-यांवर ही वेळ आली आहे. असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी केले.
शेवगाव – पाथर्डी मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विधिज्ञ प्रताप ढाकणे यांच्या प्रचारार्थ शेवगाव येथे आयोजीत सभेत ते बोलत होते. यावेळी भाकपचे राष्ट्रीय सचिव भालचंद्र कांगो, माजी मंत्री फौजिया खान, खासदार निलेश लंके, नितेश कराळे गुरुजी, उमेदवार अँड.प्रताप ढाकणे, संदिप वर्पे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महिला जिल्हाध्यक्ष योगिता राजळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरीश भारदे,ऋषिकेश ढाकणे उपस्थित होते.
यावेळी पवार म्हणाले की, राज्यातील कष्टकरी, शेतकरी त्यांच्या दृष्टीने आशादायक चित्र निर्माण करण्यासाठी व युवकांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी वचनबध्द आहे. आठ महिन्याच्या काळात राज्यातील ९०० महिला भगिनींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व फुले, शाहू , आंबेडकरांच्या राज्यात हे अत्याचार सहन करणे अशक्य आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली राज्यघटना बदलण्याचा प्रयत्न तुम्ही सर्वांनी लोकसभेत हाणून पाडला. लोकसभा निवडणुकीत मोदींनी दिलेला चारशे पार जागांचा नारा महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ खासदार त्यांच्या विरोधात देवून केंद्रातील सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम केले.आता विधानसभेत सत्ता परिवर्तनाची गरज आहे.ते करुन जागरुक मतदार असल्याचे दाखवून दया.
कांगो म्हणाले, यशवंतराव चव्हाणांनंतर राज्याला दिशा देणा-या शरदचंद्र पवार यांच्या सोबत आम्ही महाविकास आघाडीमध्ये सहभागी आहोत. आपल्या सगळ्यांना लढून राज्यावर आलेले हे संकट दुर करायचे आहे.देशातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न घटले आहे. शेतीमालाला भाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. देशाला व राज्याला आर्थिक अधोगतीकडे नेणा-या एका मोठया राजकीय षडयंत्राचे आपण बळी आहोत. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या मुंबईचे आर्थिक महत्व कमी करुन ते अहमदाबाद व गुजरातकडे वळवून मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याचे काम ही दोन्ही सरकारे करत आहेत.
यावेळी अपक्ष उमेदवार राजेंद्र ढाकणे यांनी प्रताप ढाकणे यांना जाहीर पाठींबा दिला. जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप लांडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे, बाजार समितीचे माजी सभापती संदिप सातपुते, शेवगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक शब्बीर शेख, अजय भारस्कर, वर्षा लिंगे, इंदुबाई म्हस्के, विकास फलके आदींसह शेवगाव – पाथर्डीतील अनेक पदाधिका-यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्तविक अँड. प्रताप ढाकणे यांनी तर सुत्रसंचालन उध्दव काळापहाड यांनी केले. शिवशंकर राजळे यांनी आभार मानले.

