कोपरगाव विधानसभेच्या मतदानासाठी २ हजार कर्मचारी सज्ज
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १८ : कोपरगाव विधानसभा मतदार संघातील संपूर्ण उमेदवारांची प्रचार यंञणा आज शांत झाल्या, प्रचाराच्या सर्व तोफा थंडावल्या पण शासकीय यंञणां सतर्कतेने निवडणुक प्रक्रीया पुर्ण करण्यासाठी तब्बल १ हजार ९७३ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा सज्ज ठेवून मतदान करुन घेण्याची तयारी सुरु केली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी निवडणुकीत निर्णय अधिकारी सायली सोळंके व सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार महेश सावंत यांच्या खांद्यावर आहे. या मतदार संघात एकुण २ लाख ८९ हजार ६५६ मतदार असुन त्यात स्ञी- १ लाख ४३हजार ३१३, पुरुष – १ लाख ४६ हजार ३३७ व इतर ६ मतदार आहेत. एकुण मतदारापैकी १६१८ मतदार शासकीय कर्मचारी अर्थात टपाली मतदार आहेत त्यांना शंभर टक्के टपाली मतपञीका पाठवण्यात आले आहेत.
मतदार संघात ८५ वर्षांपेक्षा अधिक तसेच ४० टक्के पेक्षा अधिक दिव्यांग असलेले एकुण मतदार २१८ असुन त्यातील २०५ मतदारांनी घरात बसुन मतदानाचा हक्क बजावला आहे. उर्वरित मतदान प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके व सहाय्यक निवडणूक अधिकारी महेश सावंत यांनी संपूर्ण यंञणा सज्ज केली आहे.
मतदार संघात एकुण २७२ मतदान केंद्र असुन त्यात एक महीलांचा गुलाबी मतदान केंद्र आहे. युवकांचा व दिव्यांग बांधवांचा मतदान केंद्रासह विशेष ६ मतदान केंद्र तयार करुन मतदारांना आकर्षीत करण्यात बरोबर शंभर टक्के मतदान घडवण्याची तयारी प्रशासनाच्यावतीने केली आहे. निवडणुक प्रक्रीया सुरळीत व्हावी यासाठी २७२ मतदान केंद्रावर १ हजार ४९५ कर्मचारी चोख कर्तृत्व बजावणार आहेत. २७२ मतदान केंद्रावर २७२ मतदान यंञ असुन ५४ मतदान यंञ राखीव ठेवण्यात आले आहेत. मतदान यंञे व मतदान केंद्रावर गावनिहाय जाण्या-येण्यासाठी ९४ वाहनांची स्वतंत्र व्यवस्था केली त्यात २७ बस, २१ मिनी बस, ७ क्रूजरसह इतर मिळुन ९४ वाहनांचा ताफा असणार आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीसांचा खडा पहारा असणार आहे. त्यात २७२ पोलीस कर्मचारी २८ पोलीस निरीक्षक व २८ सहाय्यक पोलीस अधिकारी, ७ अतिशिग्र प्रतिसाद पथके तैनात केली आहेत. मतदार संघात ९ भरारी पथके रवाना करण्यात आली आहेत. निवडीसाठी लागणारे साहित्य व इतर सामुग्री देवाण घेवाण साठी १५० कर्मचारी सज्ज आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर अपेक्षित सुविधा पुरवण्याची व्यवस्था केली असुन मतदारांनी २० नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत मतदानासाठी नागरीकांना जाणे बंधनकारक आहे. शंभर टक्के नागरीकांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन निवडणुक निर्णय अधिकारी व स्थानिक प्रशासनाने केले आहे.
मतदान प्रक्रिया शांततेत व सुलभ पुर्ण होण्यासाठी कोपरगाव मध्ये जय्यत तयारी झाली आहे. मतदान ओळखपत्र नसलेल्या नागरीकांनी निवडणूक आयोगाने ठरवुन दिलेल्या १२ पुराव्या पैकी कोणताही एक पुरावा देवून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोपरगाव मतदार संघात यावेळी विक्रमी मतदान घडवून आणण्यासाठी शासकीय यंञणा प्रयत्न करीत असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके व महेश सावंत यांनी सांगितले. उमेदवारांनी आचारसंहितेचे तंतोतंत पालन करावे असेही ते म्हणाले.