कोपरगाव प्रतिनिधी, दि.१२ : केवळ स्वता:पुरते जीवन जगायचे म्हणून जगायचे नाही तर खऱ्या अर्थाने जीवन कसे जगावे यांची शिकवण आपल्या कृतीतून शिकवणारे उदार मनाचे कृतीशील व्यक्तीमत्व म्हणजे स्व. शिवाजी संधान होय. आयुष्याच्या वाटेवरील अनेक चढउतारांचा सामना करीत यशवंत कीर्तीवंत पिढी घडवण्याचे काम स्व. संधान यांनी केले.
जीवन हे एक सुंदर गीत आहे. जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ असतो. अनेक अंगांनी नटलेले, सजलेले हे जीवन आपण सुंदरतेने जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इतरांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन दुसऱ्यांनाही आनंदात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने दीन-दुबळ्यांना मदत करून, गोरगरिबांचे अश्रू पुसून, भुकेल्यांना अन्न देऊन परोपकारी वृत्तीने जीवन जगले पाहिजे. मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे आणि अशी सेवा करून माणसांनी आपल्या जीवनाचे सार्थक केले पाहिजे. प्रत्येकाच्या हृदयात आपले स्थान निर्माण करता आले पाहिजे. जर आपण परोपकारी वृत्तीने कार्य केले तर या विश्वात कीर्ती रुपाने जिवंत राहू शकतो.
‘मरावे परी कीर्ती रूपे उरावे’ ही म्हण स्व. शिवाजी संधान यांच्या जीवनाला तंतोतंत लागू पडते. काही लोक केवळ नावासाठी व मोठेपणासाठी जगतात पण स्व. संधान हे इतरांच्या कल्याणासाठी जगले. कुठेही गवगवा नाही, नातेसंबंध पणाचा बडेजावपणा कधी केला नाही. कोणताही गर्व मनी नाही. सर्वसामान्य जीवन जगत इतरांसाठी कायम झटत राहिले.
मोठेपणा सर्वांना हवा असतो, पण त्यासाठी झिजण्याची कोणाचीही तयारी नसते. जगायचे तर सारेच जगतात. परंतु काही माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी झटत असतात. स्व. शिवाजी आनंद संधान हे त्यापैकीच एक होते. ५ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी पाच वाजता अल्पशा आजाराने वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुमन संधान, दोन भाऊ, सुषमा नानासाहेब जगताप, संगीता नानासाहेब गायकवाड, मनीषा शरद गटकळ, अनिता किरण शिंदे या चार विवाहित मुली, पराग संधान हा एक मुलगा, सून, नातवंडे असा मोठा आप्त परिवार आहे. पराग संधान हे अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
स्व. शिवाजी आनंद संधान यांची जीवनगाथा समाजासाठी प्रेरणादायी अशीच आहे. १ जून १९३५ रोजी जन्मलेले स्व. शिवाजी संधान हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील दहिवाडी (ता. सिन्नर) या गावचे रहिवासी पण कोपरगाव तालुका हीच त्यांची कर्मभूमी राहिली. ते नम्र, सुसंस्कृत, जिज्ञासू, अभ्यासू, निगर्वी, नि:स्वार्थी, प्रामाणिक, मितभाषी व मनमिळावू स्वभावाचे होते. साधी राहणी, उच्च विचारसरणी असे त्यांचे आदर्श व बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. पैसा, पद आले तरी त्यांनी आयुष्यभर साधेपणा जपला. आपल्या वागण्यातून, कृतीतून त्यांनी समाजासमोर आदर्श उभा केला. ते कुटुंबवत्सल, धार्मिक व परोपकारी वृत्तीचे सद्गृहस्थ म्हणून परिचित होते.
सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या शिवाजीरावांनी जीवनात मोठे होण्याचे स्वप्न लहानपणीच पाहिले होते. खडतर परिस्थितीशी संघर्ष करीत त्यांनी आपल्या स्वप्नांची पूर्तता केली. गुणांनी मोठे होण्याचा ध्यास घेऊन ते सतत काम करीत राहिले. आपले कर्म हीच आपली ओळख आहे, असे ते मानत असत. ते आयुष्यभर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समर्पित वृत्तीने जगले. त्यांनी आपल्या मुला-मुलींवर सुसंस्कार करून त्यांना उच्च शिक्षण दिले. स्वावलंबी जीवन जगण्याची शिकवण दिली. त्यांनी आपल्या कर्तृत्वसंपन्न जीवन जगण्यातून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. परोपकारी वृत्ती असलेल्या स्व. शिवाजी संधान यांनी अनेक लोकांना अडीअडचणीच्या काळात भरभरून मदत केली. केलेल्या मदतीचा त्यांनी गवगवा केला नाही.
सुस्वभावाने व आदर्शवत कार्याने जनमाणसावर स्व. संधान यांनी मोहिनी घातली होती. सहकाराच्या माध्यमातून व व्यक्तिगत कार्यातून त्यांनी असंख्य माणसे जोडले. ते इतरांना नेहमी अदबीने बोलायचे. मान-सन्मान द्यायचे. कधीही कोणाशीही मोठ्या आवाजात बोलले नाहीत. त्यांनी कधीही आपली मते इतरांवर लादली नाहीत. पण चांगल्या गोष्टी झाल्या पाहिजेत, यासाठी ते सतत आग्रही राहिले. त्यांना कोणत्याही प्रकारचा लोभ, द्वेष, मत्सर, अहंकार नव्हता. त्यांचे मन विशाल होते. त्यांच्या ठायी ठायी मनाचा मोठेपणा दडलेला होता.
प्रत्येकाच्या आयुष्यात अनंत वळणे येत असतात. तशी स्व. शिवाजी संधान यांच्या जीवनातही अनेक वळणे आली. कधी सुखाची तर कधी दु:खाची. मात्र, योग्य वेळी योग्य वळण घेऊन त्यांनी आपले कर्तव्य पार केले. त्यांनी अनेकांच्या जीवनाला आधार देऊन त्यांच्या आयुष्याचे तोरण बांधले. मदतीचा हात देवू सुखाची पेरणी केली. इतरांच्या हितासाठी कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी त्यांच्यात होती. त्यांच्यातील दिसणाऱ्या नेतृत्वगुणांची कसब यामुळे लढवय्ये व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती कोपरगाव तालुक्यात होती.
स्व. शिवाजी संधान हे शेवटच्या श्वासापर्यंत सर्व कार्यात सक्रिय राहिले. ते कोपरगाव शहरात इंदिरा पथ भागात वास्तव्यास होते. सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी पुढाकार होता. नाव कमी काम ज्यास्त अशी त्यांची वेगळी ओळख होती. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांशी त्यांचे स्नेहाचे संबंध होते. विविध संस्था-संघटनांमध्ये त्यांनी अनेक पदांवर काम केले. पण कधीच कोणत्या पदाचा गर्व केला नाही किंवा कोणत्या पदाचा मोह मनी धरला नाही. आपल्या कार्यातून त्यांनी वेगळा ठसा उमटवला होता. कोळपेवाडी येथील कोपरगाव सहकारी साखर कारखान्यात (आत्ताच्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्यात) त्यांनी २१ जानेवारी १९६० ते २० एप्रिल १९८९ पर्यंत सेवा बजावली.
सन १९८२ मध्ये स्व संधान यांनी कामगार सोसायटीचे चेअरमनपद भूषवले होते. शरद पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक संचालक होते. सन २००४ ते २००९ या काळात ते संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे (आताचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे) संचालक होते. संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेचे ते विश्वस्त होते, यशवंत सहकारी कुक्कुटपालन संस्थेचे संचालक, इंदिरा पथ येथील गणेश हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी काम करून समाजातील अनेक घटकांना मोठे योगदान दिले. त्यांनी स्वत:च्या दहीवाडी या गावी शेतकऱ्यांच्या हितासाठी ओम साई शेतकरी विकास संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबविले. त्यांनी विविध संस्थांमध्ये काम करीत असताना मार्गदर्शकाची भूमिका बजावली.
माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांचे ते विश्वासू सहकारी होते. स्व. कोल्हे साहेबांचा त्यांना दीर्घ काळ सहवास लाभला. त्यांनी स्व. कोल्हे साहेबांसोबत खांद्याला खांदा लावून काम केले. त्या काळात त्यांना बराच राजकीय त्रास सहन करावा लागला. अनेक संकटे आली, अडचणी आल्या तरी ते आपल्या ध्येयापासून तसूभरही मागे हटले नाहीत. त्यांनी आपल्या तत्त्वांशी, विचारांशी कधीही तडजोड केली नाही. आपली निष्ठा त्यांनी कधीच ढळू दिली नाही. विश्वासार्हतेला तडा जाऊ दिला नाही. ते शेवटच्या श्वासापर्यंत स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांच्याशी एकनिष्ठ राहिले. स्व. कोल्हे त्यांना वेळोवेळी वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी देऊन स्व. संधान यांना निष्ठेची, विश्वासाची पावती दिली.
कोल्हे कुटुंबीयांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे व कौटुंबिक संबंध होते. कोल्हे परिवाराशी त्यांचे अत्यंत जवळचे नाते असुनही ते कधीच नात्याचा गवगवा केला नाही. बडेजाव दाखवला नाही. नातं आणि निष्ठा दोन्हीही आपुलकीने जपले. त्यांनी स्व. कोल्हे संजीवनी सहकारी साखर कारखाना, यशवंत पोल्ट्री अशा अनेक संस्थांमध्ये काम केले. स्व. शिवाजी संधान हे जिज्ञासू व चिकित्सक वृत्तीचे होते. त्यांना वाचनाची खूप आवड होती. ते दैनंदिन वृत्तपत्रे व विविध विषयांवरील पुस्तके वाचत असत. शेतीसोबत समाजकारण व राजकारणाचा त्यांना छंद होता. रोजच्या कामातून वेळ काढून त्यांनी आपला छंद जोपासला. दैनंदिन घटना-घडामोडींचा त्यांचा चांगला अभ्यास होता.
लोकांचे मन जिंकण्याची कला त्यांना निसर्गाने दिली होती. आपल्या मृदू स्वभावाने त्यांनी मोठ्या प्रमाणात मित्र परिवार जोडला होता. अनेकांशी त्यांचे निकटचे व जिव्हाळ्याचे संबंध होते. वयाच्या ८९ व्या वर्षीही त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत होती. या वयातही दररोज फिरणे, व्यायाम करणे हा त्यांचा दिनक्रम कधी चुकला नाही. सामान्य माणसांशी त्यांची नाळ जुळली होती. दररोज फिरत असताना रस्त्यात कोणी माणूस भेटला की, ते स्वत: थांबून त्यांची आपुलकीने विचारपूस करीत असत. शेवटपर्यंत ते कार्यरत राहिले.
थोर पुरुषाची कीर्ती आपोआप फुलातील सुगंधाप्रमाणे सदैव पसरते. स्व. शिवाजी संधान यांनी आपला देह चंदनासारखा झिजवला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी कष्टाचा व त्यागातून जीवनात यश मिळवले. प्रत्येकाच्या जीवनात असे क्षण येतात जिथे खूप काही सोसावे लागते. ज्यांच्या जीवनात त्याग, सहनशीलता, नम्रता, प्रेम, निस्वार्थ भाव अशा गुणांचा सुगंध दरवळतो.
त्यांच्या जीवनातले क्षण आपल्याला खूप काही शिकवून जातात. त्यांच्या कार्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते. स्व. शिवाजी संधान यांचे जीवनकार्य सर्वांना प्रेरणादायी आहे. स्व. शिवाजी संधान यांच्या कृतीशील विचारांची शिदोरी त्यांचे सुपुत्र पराग संधान यांच्या सोबत आहे. म्हणुनच पराग संधान हे आपल्या वडिलांचा वसा व वारसा पुढे घेवून जात आहेत. स्व. संधान यांच्यासारख्या प्रतिभावंत व कृतिशील व्यक्तीमत्वाला भावपूर्ण आदरांजली.