शेवगाव-पाथर्डी २२२ मतदार संघात शांततेत मतदान

मतदान करते वेळीचे चित्रिकरण समाज माध्यमावर प्रसारीत केल्याने एकावर गुन्हा दाखल

शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : शेवगाव पाथर्डी २२२ मतदार संघात अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले. विधासभा निवडणुकीसाठी सकाळच्या दरम्यान थंडीचे वातावरण असल्याने मतदान धिम्या गतीने सुरु झाले. तर १० वाजेनंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी सुरु झाली. सकाळी ९ वाजेपर्यंत ५.६ टक्के तर दुपारी १ वाजेपर्यंत २९.१८ टक्के मतदान झाले. त्यानंतर ३ वाजेपर्यंत ४२. ३२ टक्के सायंकाळी ५ ला ५६.५ टक्के मतदान झाले.

मतदान कालावधीत भातकुडगाव, भायगाव, शेवगाव ( क्रं. ७१ ) व शिंगोरी या ४ गावात सकाळी मतदान सुरु होताच त्यानंतर दिवसभरात  शेवगाव तालुक्यातील बऱ्हाणपुर, बक्तरपुर,  वरूर, लोळेगाव तसेच पाथर्डी तालुक्यातील निवडूंगे, हंडाळवाडी, निपानी जळगाव व  बोरसेवाडी या १२ गावात मतदान केंद्रावरील यत्रांत बिघाड झाल्याने ते तात्काळ चालु करण्यात आले.

विशेष मतदान केंद्रातर्गत सामनगाव येथील सखी व तळणी येथील दिव्यांग मतदान केंद्राला मतदारांनी उत्तम प्रतिसाद दिला. शेवगाव तालुक्यातील तब्बल ८५ किलोमिटर वरील पैठणच्या पुढे असलेल्या विजयपुर गावाच्या मतदान केंद्राची आकडेवारी येण्यास विलंब होत असल्याने प्रशासनास अडचणी आल्या. विविध गावातील मतदान केंद्रावर दैनदिंन शेती कामे बाजुला सारून मतदानासाठी महिलांनी उत्सफुर्तपणे प्रतिसाद दिल्याने महिला मतदारांच्या रांगाचरांगा दिसुन आल्या.

महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिकाताई राजळे यांनी कुटुंबियासह कासार पिंपळगाव येथे, तर अपक्ष उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी दहिगावने येथे तर महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. प्रताप ढाकणे यांनी येथे अपक्ष उमेदवार हर्षदा काकडे यांनी शेवगावला मतदानाचा हक्क बजावला.

शेवगाव तालुक्यातील रांजणी येथील मतदान केंद्रावर सकाळी ९ वाजेदरम्यान भारत औटी या मतदाराने मतदान करते वेळी त्याचे चित्रिकरण करुन समाज माध्यमावर प्रसारीत केल्याने तहसीलदार तथा सहाय्यक निवडणुक अधिकारी यांच्या आदेशाने कृषी अधिकारी सांरग दुगम यांनी त्याच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

१८४ मतदान केंद्र सिसिटिव्ही निगराणीत –
     कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने शेवगाव पाथर्डी मतदार संघातील १८४ मतदान केंद्रावर सीसीटीव्हि कॅमेरे बसविण्यात आले असल्याने त्याचे तहसील कार्यालयात थेट चित्रिकरण दिसत असल्याने निवडणुक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणुक अधिकारी हे एखाद्या मतदान केंद्रावर गर्दी अथवा मोबाईल दिसल्यास संबंधीत केंद्र प्रशासनाला वेळोवेळी सुचना करत होते. या निगराणीमुळे मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडण्यास मदत झाली.

शेवगाव तालुक्यातील ठाकूरनिमगावच्या  सुखदेव भगत व कमलाबाई भगत या मतदारांनी  बैलगाडीतून येऊन मतदान केंद्र क्रमांक १२६ मध्ये मतदानाचा हक्क बजावला. 

Leave a Reply