२० टेबलवर २० फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार
कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचं चिञ आज स्पष्ट होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासायकीय यंञणा सज्ज झाली आहे. २० टेबलवर २० फेऱ्यामध्ये मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार महेश सावंत यांनी दिली.
अधिक माहीती देताना म्हणाले की, २०२४ कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एकुण २ लाख ८९ हजार ६५६ मतदारांपैकी २ लाख ६ हजार ५५५ अर्थात ७१.३१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात पुरुष- १ लाख ७ हजार १९४ , स्ञी- ९९ हजार ३५७ व ४ तरांनी मतदान केले.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतमोजणीसाठी सर्व यंञणा सतर्क ठेवण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. सोबतीला राज्य राखीव पोलीस दल व स्थानिक पोलीसांचा फौजफाटा चोख बंदोबस्त ठेवला आहे. शहरातील सेवानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल येथे मतमोजणी होणार आहे.
मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात होणार आहे. सुरुवातीला टपाली मतदान मोजले जाणार आहे, त्यानंतर साडे आठ वाजता मतदान यंञातील मतमोजणीला सुरुवात केली जाईल. पहील्या फेरीचा निकाल सकाळी ९ वाजता लागेल. उर्वरित फेऱ्यांचा निकाल पुढे लागत राहील.
मतमोजणी वेळेत पुर्ण करण्यासाठी १७५ कर्मचारी कार्यरत असणार आहेत त्यांना सकाळी ७ वाजता कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. प्रत्येक टेबलवर करडी नजर ठेवण्यासाठी मतमोजणी निवडणुक विशेष निरीक्षक म्हणुन मध्यप्रदेश येथील अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रत्येक टेबलनिहाय करण्यात आली आहे. परराज्यातील सुरक्षा जवान तैनात असल्याने स्थानिक पोलीसांसह इतर कर्मचाऱ्यावर दबाव असणार आहे.
मतमोजणीसाठी मतदार संघातील निवडणुत उभे असलेल्या १२ उमेदवारांचे फक्त १२ प्रतिनिधी अर्थात एजंट टेबल निहाय प्रत्येकी एक उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रतिनिधीसह एजंट यांना मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तु मतमोजणीच्या ठिकाणी घेवून जाता येणार नाही. मतमोजणी केंद्रावर नागरीकांची गर्दी होणार नाही याची दक्षता स्थानिक प्रशासनाने घेतली असुन शहरातील राम मंदीर रोड ते कोपरगाव ग्रामीण रुग्णालय रोड रहदारीसाठी सकाळपासून बंद ठेवण्यात आला आहे.
रुग्णालयात व मतदान केंद्रातील कर्मचारी यांना जाणाऱ्यांसाठी लक्ष्मीनगर मार्गे रस्ता खुला ठेवला आहे. निवडणुक आयोगाच्या ओळख पञाशिवाय तेथे कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी दिली. दरम्यान दुपारी ३ वाजे पर्यंत कोपरगाव मतदार संघाचा आमदार कोण हे निश्चित होणार आहे. मतदारांनी मतदानातून आमदार निवडला आहे फक्त मतमोजणीतून जाहीर होणार आहे. या निवडणुकीत कोणाचा काय विक्रम होते याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.