शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : घेतलेल्या कर्जाच्या थकीत बाकी पोटी दिलेला धनादेश वटला नाही, म्हणून श्री रेणुका माता मल्टीस्टेट को. ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी या संस्थेने अहिल्यानगर येथील न्यायालयात दावा दाखल केला असता तेथील सातवे अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी आय. एम. नाईकवाडी यांनी कर्जदारस ६० हजार रुपये दंड व एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, बाळासाहेब दादा शेजवळ राहणार येवला जिल्हा नाशिक याने श्री रेणुका माता मल्टीस्टेट को. ऑप अर्बन क्रेडिट सोसायटी या संस्थेच्या येवला येथील शाखेतून ६ डिसेंबर २०२२ ला एक लाख रुपये कर्ज घेतले होते. कर्जदार शेजवळ याने कर्जाची काही रक्कम भरल्यानंतर थकीत रकमेसाठी २३ एप्रिल २०२३ ला एचडीएफसी बँकेचा ४५ हजार ६०० रुपयाचा धनादेश संस्थेला दिला होता.
मात्र हा धनादेश वाटला गेला नसल्याने श्री रेणुका माता मल्टी स्टेट संस्थेच्यावतीने धीरज आव्हाड यांनी अहिल्यानगर न्यायालयात शेजवळ याच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. त्यावर अतिरिक्त मुख्यन्यायदंडाधिकारी नाईकवडी यांनी शेजवळ यास साठ हजार रुपये दंड व एक महिना सश्रम कारावास, दंड न भरल्यास सात दिवसाचा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.