शेवगाव प्रतिनिधी, दि .१० : विजेचा अनाधिकृत वापर करीत असताना आढळून आलेल्या व्यक्तीचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियत्यांना दमदाटी करणाऱ्या तालुक्यातील मुर्शदपुर येथील दोघाच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा शेवगाव पोलिसात दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता मिलिंद सुनील भामरे यांनी शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून सविस्तर वृत्त असे कि, कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ चंद्रकांत मेंदड, मनोहर बोचरे, अविनाश पेटारे, संतोष कोठुळे यांचे पथक कार्यकारी अभियंता लक्ष्मणराव काकडे उपकार्यकारी अभियंता मनोज पुरोहित यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील खरडगाव मुर्शिदपूर परिसरात विज चोरी मोहीम कारवाई करणे कामी गेलो असताना मुर्शतपुर येथील रवींद्र अशोक धावणे व शेषराव विठ्ठल धावणे यांनी पथकाला शासनाने नेमून दिलेले कर्तव्य करीत असताना कामकाजात व्यत्यय आणून आमचा वीज पुरवठा कोणतीही विचारपूस न करता का खंडित करीत आहात असे म्हणून हातात लाकडी दांडका घेऊन अंगावर धावून येऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचे म्हटले आहे.
याबाबत मुर्शिदपूर येथील रवींद्र अशोक धावणे, शेषराव विठ्ठल धावणे या दोघांवर रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भास्कर गावंडे हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान विजेचा अनाधिकृत वापर हा रीतसर गुन्हा असल्याने कोणीही विजेचा अनाधिकृत वापर करू नये संबंधितांनी वीज वितरण कंपनीशी संपर्क साधून कोटेशन भरून अधिकृत वीज पुरवठा घ्यावा. यावेळी कोणत्याही प्रकारे अनाधिकृत वीजपुरवठा घेऊ नये असे आवाहन उपकार्यकारी अभियंता पुरोहित यांनी केले आहे.