कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : राज्यातील २०२४-२५ चा गळीत हंगाम सुरु होवून जवळपास एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकाही साखर कारखान्याकडून ऊस दराबाबत निर्णय घेतलेला नाही. परंतु कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत साखरेच्या घसरलेल्या दराचा विचार न करता २०२४-२५ च्या गळीतास येणाऱ्या ऊसाला पहिली उचल प्र.मे.टन २,८००/- रुपये देण्याचे जाहीर करून गाळप झालेल्या ऊसाचे पंधरवाडानिहाय पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले असल्याची माहिती कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.
आमदार काळे सध्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे आहेत. एकीकडे मतदार संघाला विकासात्मकदृष्ट्या अग्रभागी ठेवण्यासाठी हिवाळी अधिवेशन महत्वाचे आहेच त्याचबरोबर कारखान्याची जबाबदारी सांभाळत असतांना शेतकरी हित जोपासणे देखील तेवढेच महत्वाचे आहे.
त्यामुळे त्यांनी ऊस दराच्या पहिल्या उचलीबाबत आपली भूमिका नेहमीप्रमाणे सर्वप्रथम जाहीर केली आहे. एका बाजूला ऊसाच्या एफआरपीत सातत्याने होणारी वाढ ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे परंतु दुसरीकडे साखर विक्रीचे घसरलेले दर ही साखर उद्योगासाठी चिंताजनक बाब आहे.
साखरेचा किमान विक्री दर रु.३,६००/- प्र.क्विंटल करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे. परंतु २०२४-२५ चा गळीत हंगाम सुरु होवून जवळपास एक महिन्याचा कालावधी पूर्ण होत असतांना अद्यापपर्यंत ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. साखरेचे दर हे २०० ते ३०० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे साखर उद्योगाला अवघड परिस्थितीचा सामना करावा लागत असून साखर कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.
चालू गळीत हंगाम हा मागील गळीत हंगामापेक्षा कमी दिवसांचा व कमी ऊस गाळपाचा राहणार आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस दराबाबत धाडसी निर्णय घेवून पहिली उचल प्र.मे.टन २,८००/- रुपये देण्याचा जिल्ह्यात सर्वप्रथम निर्णय घेवून प्रत्यक्षात अंमलबजावणी देखील केली आहे. कारखान्याने गळीत हंगाम सुरु झाल्यापासून १५ डिसेंबर अखेर १,३८,४२१ मे.टन ऊसाचे गाळप करून १,२०,३२५ साखर पोती उत्पादन केले असून साखर उतारा १०.४१ एवढा मिळाला आहे.
चालू वर्षी पर्जन्यमान समाधानकारक झालेले असून सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत व उन्हाळ्यात देखील गोदावरी कालव्यांना समाधानकारक आवर्तन मिळणार आहेत. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रातील सभासदांनी जास्तीत जास्त ऊस लागवडी कराव्यात. जेणेकरून कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील ऊसावरचे अवलंबित्व कमी होवून ऊस वाहतूक खर्चात बचत होण्यास मदत होईल व त्याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस दरामध्ये होवू शकतो. त्यासाठी जास्तीत जास्त ऊस लागवडी कराव्या असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.