तालुक्यात चर्मरोग नियंत्रण व रोगमुक्त महाराष्ट्र मोहीम युद्धपातळीवर

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : तालुक्यात लम्पी चर्मरोग नियंत्रण व रोगमुक्त महाराष्ट्र या ७ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या काळात राबविण्यात येत असलेल्या मोहिमेअंतर्गत ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ हा उपक्रम सध्या शेवगाव तालुका पशुसंवर्धन विभाग युध्द पातळीवर राबवित आहे. पशुसंवर्धन विभागाने या मोहिमेची माहिती देण्यासाठी परिसरातील पशुपालकांचे प्रशिक्षण घेऊन प्रबोधन केले आहे. त्यास परिसरातील पशुपालकiनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

गावपातळीवरील प्रत्येक गावातील सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांचा सहभाग घेण्यात आला असून गावांतील दोन स्वयंसेवक, एकपशु वैद्यकीय अधिकारी वा कर्मचारी,  परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांच्या समक्ष भेटी घेत असून त्यांना लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपायोजना व ‘ माझा गोठा स्वच्छ गोठा ‘ उपक्रमाची सविस्तर माहिती देत आहेत.

यावेळी गोठा व परिसराची स्वच्छता करवून घेरुन फॉगींग मशीनद्वारे फवारणी करुन घेण्यात येत आहे. झालेल्या कामाचा आढावा सनियंत्रण अधिकारी तथा पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहूल कदम तसेच तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. चारुदत्त असलकर समक्ष प्रत्यक्ष पहाणी करुन घेत आहेत.

     तालुक्यातील ७० हजार १४० जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तरीही अन्य काही ठिकाणी लम्पीचा प्रादुर्भाव आधिक असल्याने सर्वच पशुपालक काळजीत आहेत. तालुक्यात आज अखेर १३०१ जनावरे बाधित आढळली असून त्यापैकी ८८४ औषधोपचारानंतर बरी झाली आहेत ३७६ जनावरावर सध्या उपचार सुरू आहेत. तर ४१ जनावरे दगावली आहेत.